जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला निर्धार
| माथेरान | वार्ताहर |
संपूर्ण माथेरान प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केला आहे. माथेरानच्या पाहणी दौऱ्यानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माथेरान, महाबळेश्वर व लोणावळा ही पर्यटनस्थळे प्लास्टिकमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी येथील नागरिक व व्यापारी वर्गासोबत सविस्तरपणे चर्चा केली. माथेरानच्या जंगलात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या त्याचप्रमाणे अन्य प्लास्टिकजन्य कचरा पर्यटक टाकत असतात, त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याने पाण्याच्या बाटल्या बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. म्हसे यांनी सांगितले. या प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण मंडळ निधी देणार असून, आर.ओ. पाणी शुद्धीकरणचे प्लांट नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. पर्यटक मोठ्या प्रमाणात पातळ प्लास्टिकचे पावसाळ्यात रेनकोट वापरतात व परत जाताना जंगलात फेकून देतात, अशा रेनकोटवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी क्ले पेव्हर ब्लॉक्स च्या रस्त्यांची पाहणी केली. सध्या ब्लॉक्सच्या रस्त्यांच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली व सनियंत्रण समितीला ब्लॉक्सचा पाहणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. व्हॅली क्रॉसिंग सुरू करण्यापूर्वी सुरक्षिततेचा विषय महत्त्वाचा आहे व नगरपालिकेच्या नियंत्रणाखाली व्हॅली क्रॉसिंग सुरू करण्याबाबत विचार होऊ शकतो, असे डॉ. म्हसे यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीत माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेवक शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, व्यापारी मंडळ अध्यक्ष राजेश चौधरी, राकेश कोकळे, अमोल चौगुले, कुलदीप जाधव, प्रदीप घावरे, प्रवीण सकपाळ, माजी नगरसेविका प्रतिभा घावरे, वर्षा शिंदे, स्नेहा चव्हाण, अर्चना बिरामने, सुहासिनी दाभेकर, सुजाता जाधव यांनी चर्चेत भाग घेऊन महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी आभार मानले.