किसान क्रांती संघटनेकडून मागणी
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील भातशेतीचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी किसान क्रांती संघटना यांनी केली आहे. प्रांत अधिकारी यांना सादर केलेले निवेदनात किसान क्रांती संघटनेकडून ही मागणी करण्यात आले आहे.
ऑक्टोबर महिना संपत आला तरी परतीचा पाऊस तालुक्याचे वेगवेगळ्या भागात हजेरी लावत आहे. त्यामुळे भाताची शेती पावसाच्या पाण्यात भिजत असून भाताच्या शेतीचे मोठे नुकसान परतीच्या पावसाने केले आहे. कर्जत तालुक्यातील भातशेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी किसान क्रांती संघटनेने तहसीलदार आणि प्रांत अधिकारी तसेच कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. परतीच्या पावसामुळे उभे असलेले भात पीक शेतात कापण्याआधीच जमिनीवर पडले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी सरसकट पंचनामे करून शेतकर्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. त्यात रायगड जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यात पंचनामे करण्याच्या सूचना या आधीच तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. तालुका स्तरावर भाताच्या शेतीचा नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग, महसूल विभाग आणि पंचायत समिती यांच्याकडून सुरू आहेत, अशी माहिती किसान क्रांती संघटनेच्या पदाधिकारी यांनी कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी दिली. किसान क्रांती संघटनेकडून कर्जत उप विभागीय अधिकारी तसेच कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जावून भाताच्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
किसान क्रांती संघटनेचे संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तम शेळके, अध्यक्ष भरत राणे, तसेच रामदास माळी, भाऊ खानविलकर, प्रकाश कांबेरे, मोरेश्वर भगत, सुरेश जाधव, विनायक देशमुख, अरुण शेळके, सदस्य रवींद्र गावंड यांच्यासह शेतकरी रोहिदास बडेकर, मंगेश बडेकर, तानाजी राणे, नारायण राणे, दत्तात्रेय देशमुख, काशिनाथ पादिर आदी उपस्थित होते.