पूरग्रस्तांचे शिल्लक राहिलेले पंचनामे करा

चिरनेर ग्रामस्थांची मागणी

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील चिरनेर गावातील नागरिकांच्या घरांचे पंचनामे करण्याचे काम 28 जुलैपासून थांबविण्यात आले असल्यामुळे येथील पूरग्रस्त नागरिकांनी महसूल खात्याच्या प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अरुण मुंबईकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ऑनलाइन निवेदन दिले असून, याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच ज्यांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत, ते तात्काळ करावेत, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी यांनी पंचनामे करावयाच्या राहिलेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या नावांची यादी व निवेदन उरण तहसील कार्यालयात सादर केले आहे. मागील आठवड्यात 19 जुलै रोजी मुसळधार पावसाने चिरनेर गावाला चांगलेच झोडपले होते. या पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरामध्ये पाणी, चिखल, माती जाऊन अन्नधान्य व मौल्यवान सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकंदरीत, चिरनेर गावाला सर्वाधिक पुराचा फटका बसला आहे. या पुरामध्ये नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे तहसील कार्यालयामार्फत तसेच तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चिरनेर तलाठी कार्यालयाच्या वतीने करण्याचे काम सुरू होते. यामध्ये चिरनेर गावातील पाचशेच्यावर घरांमध्ये पाणी गेल्याचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती चिरनेर तलाठी कार्यालयांमधून प्राप्त झाली आहे. तर गावातील अजूनही पंचनामे करण्याचे काम बाकी राहिले आहे.

या संदर्भात चिरनेर गावातील नागरिकांनी थेट तलाठी कार्यालय गाठून, चिरनेर सजाचे तलाठी के.डी. मोहिते यांची भेट घेतली असता, त्यांनी पंचनामे करण्याचे काम थांबले समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे मुंबईकर यांनी चिरनेर ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने, पंचनामे का थांबले आहेत, याबाबतचे निवेदन 28 जुलै रोजी पाठविले असून, याबाबतची गांभीर्याने उचित चौकशी व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version