शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधा

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन सर्वांगिण प्रगती साधा असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले. रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग संचलित गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व आदिवासी कल्याणकारी कातकरी उथान अभियान कार्यक्रम राबविला जात आहे. या सप्तसूत्री योजना उपक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकार यांच्या हस्ते पाली सुधागड येथील भक्तनिवास क्र.2 येथे सुसज्ज ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच विविध दाखले, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना धनादेश वाटप व कातकरी प्रशिक्षणार्थी भेट व मार्गर्शन कार्यक्रम पार पडला.

यावेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या मार्गदर्शनात दिव्यांगाना विकलांग असल्याचा दाखला मिळवण्यासाठी श्रम घ्यावे लागतात, मात्र दिव्यांगासाठी सुधागड प्रशासनाने स्थानिक पातळीवर दाखले वाटप कार्यक्रम अत्यंत स्तुत्यरित्या राबविला, असा उपक्रम प्रत्येक तालुकास्तरावर राबविला जावा असे आवाहन डॉ. कल्याणकार यांनी केले. तसेच स्पर्धा परीक्षा गरुड झेप मार्गदर्शन अ‍ॅप सर्वांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. गरुड झेप अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत शासन योजना प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगितले

यावेळी प्रांताधिकारी डॉ यशवंत माने,पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, निवासी नायब तहसिलदार डी.एस.कोष्ठी, नायब तहसिलदार वैशाली काकडे, गटविकास अधिकारी विजय यादव, पोलीस निरीक्षक विश्‍वजित काईनगडे, स्वदेस फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार आदी उपस्थित होते.

Exit mobile version