सरकारला होणार पश्चाताप
| जालना | वृत्तसंस्था |
मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराबाबत देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेले उत्तर आणि आंदोलनकर्त्यांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्यास दिलेल्या नकारावर जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुन्हे मागे घेतले नाही तर फडणवीसांना पुन्हा उघडे पाडू. 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर, सरकारला पश्चाताप करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सरकार आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे माहीत नाही. 24 डिसेंबरपर्यंत शंभर टक्के मराठा आरक्षण मिळणार आहे. आमच्या मुलांचे भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही मोठे केलेले नेते जर आमच्याविरोधात जायला लागले, तर त्यांना पायाखाली तुडवायला आम्हाला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातला मराठा काय आहे? हे त्यांना लक्षात येईल. सरकार हा विषय गांभीर्याने का घेत नाही, याच्यावर आमचे लक्ष आहे. आमच्या संयमाची सरकारने परीक्षा घेऊ नये, असे जरांगे म्हणाले.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. ते जर मूळ भूमिकेवर आले नाही , तर त्यांना मराठा काय हे लक्षात येईल. फडणवीस खोटे बोलले आहेत. त्यांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता मराठ्यांचा विचार करावा. जर आमची गरज नसेल तर पुढे आम्ही कोण आहोत? हे दाखवून देऊ, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
भुजबळांना सभा घेण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी जातीय तेढ निर्माण करू नये. भुजबळ घटनात्मक पदावर बसले आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने दंगलीची भाषा, कुऱ्हाडी-कोयत्याची भाषा करून राज्यात जातीय तेढ निर्माण करू नये. मराठा आरक्षणावर त्यांनी बोलू नये. नाहीतर पुढे त्यांना दाखवून देऊ, असेही जरांगे म्हणाले.