प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील महत्वाचे जंक्शन रेल्वे स्थानक असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जात आहे. नेरळ स्थानकाच्या मेकओव्हर कामामध्ये अनेक कामे मार्गी लागली असून नेरळ स्थानकातील दोन्ही फलाटावर पाच पंखे बसवले असून प्रवासी गारेगार झाले आहेत. दरम्यान फलाट दोनवरदेखील पंखे बसवण्यात यावेत, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरानसाठी मिनी ट्रेन सोडली जाते. त्यामुळे जंक्शन रेल्वे स्थानकाचा दर्जा असलेल्या नेरळ स्थानकात पर्यटक म्हणून येणारे जगभरातील प्रवासी यांच्यासाठी नेरळ स्थानकाचे नूतनीकरण केले जात आहे. या मेकओव्हरचे कामामुळे नेरळ स्थानक बदलले दिसून येत आहे. फलाट एक आणि दोनवर करोडो रुपये खर्चून मुंबई रेल महामंडळ यांच्याकडून विकास कामे सुरू आहेत. स्थानकात प्रवासी वर्गाच्या डोक्यावर छप्पर आले असून त्यावर स्काय वॉक बांधला गेला आहे. मात्र याच स्थानकात प्रवाशांना बसायला कुठेही व्यवस्था नाही. स्थानकात नवीन प्रकारचे बाकडे बसवले जाणार असून त्यामुळे कदाचित बैठक व्यवस्था प्रलंबित असावी, असे सांगितले जात आहे. मात्र सध्या प्रवासी जुन्या चार बाकड्यावर बसून उपनगरीय लोकलच्या प्रतीक्षेत असतात. त्यात दोन बाकडे स्थानकाच्या मुंबई दिशेकडे तर दोन बाकडे स्थानकाच्या कर्जत दिशेकडे ठेवण्यात आले असून ते बाकडे प्रवासी इकडे तिकडे हलवत असतात.
फलाट दोनवर प्रवाशांचे हाल
स्थानकाच्या मेकओव्हरमध्ये अनेक कामे मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आली आहेत. मात्र फलाट एकचे काम बहुसंख्य पूर्ण झाले असून फलाट दोनवर निवारा शेडचे अर्ध्या भागातील काम अंतिम टप्यात आहे. परंतु, फलाट एकवर रेल्वेकडून फलाट एकवर मोठे पंखे बसवले आहेत. त्याचा फायदा प्रवाशांना होत असून प्रवासी थंडगार हवेमुळे गारेगार झाले आहेत. फलाट दोनवर देखील नूतनीकरणाच्या काम सुरू असल्याने येथील पंखे गायब आहेत. त्यामुळे फलाट दोनच्या बाहेर असलेल्या फलाट तीन आणि चारवरील मिनी ट्रेन स्थानकातील पंख्याचा सहारा प्रवाशांना घ्यावा लागत आहे. प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने पंख्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पसेंजर असोसिएशन यांच्याकडून केली जात आहे.
