गज्या मारणे गँगवर मकोका

पुणे पोलिसांनी काढली धिंड

। पुणे । प्रतिनिधी ।

शहरातील गज्या मारणे गँगकडून पुण्यातील भाजप नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर मंत्री मोहोळ यांनी पुणे पोलिसांनी चांगलच फैलावर घेतल होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या तीन आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरुड परिसरातून धिंड काढली. पुणे पोलिसांकडून धिंड काढण्यात आलेले आरोपी हे कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीतील सदस्य असून या गुंडांची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने व आरोपींना जरब बसावा म्हणून पोलिसांनी ही धिंड काढली होती. यावेळी हाताला बेड्या आणि तोंडाला काळ कापड घालून पोलिसांनी तिघांनाही शहरातून फिरवण्यात आले. सध्या पुण्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना वाद झाला आणि देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आत्तापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर अद्याप एक जण फरार आहे, फरार असलेला आरोपी हा गुंड गज्या मारणेचा भाचा असल्याचा माहिती मिळाली आहे.

Exit mobile version