जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक विजेते होणार मालामाल

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सर्बिया येथे 24 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा 13 सदस्यीय चमूही सज्ज झाला आहे. दीपक कुमार, शिव थापा व संजीत या हिंदुस्थानच्या बॉक्सर्सवर सार्‍यांच्या नजरा असणार आहेत. या स्पर्धेतील लढती पाहण्यासाठी बॉक्सिंगप्रेमींनाही स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे.
जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच पारितोषिक दिली जाणार आहेत. यावेळी 2.6 मिलियन डॉलर्स इतकी रक्कम बक्षिसासाठी वापरण्यात येणार आहे. सुवर्ण पदक पटकावणार्‍या खेळाडूला एक लाख डॉलर्स प्रदान करण्यात येईल. रौप्य पदक जिंकणारा खेळाडू 50 हजार डॉलर्सचा धनी होईल. तसेच उपांत्य फेरीत पराभूत होणार्‍या दोन खेळाडूंना प्रत्येकी 25 हजार डॉलर्स देण्यात येणार आहेत.

Exit mobile version