‘मलंग पॉईंट’ माथेरानकरांचे श्रद्धास्थान बनलेला

| नेरळ | संतोष पेरणे |

माथेरानच्या उत्तर दिशेला असलेल्या मलंग पॉईंटवरून आजूबाजूची डोंगरशिखरे, दर्‍या दिसतात. जवळपासची गावे दिसतात आणि हश्याची पट्टी हे गाव येथून खाली दिसते. तेथील हनुमान मंदिर येथून दिसते. मलंग पॉईंट लूईसा पॉईंटच्या विरुद्ध दिशेला डोंगर कड्यावरुन गेल्यावर येतो. या पॉईंटवर कठीण खडक आणि माती आहे. पावसाळ्यात चिखल होतो आणि त्यामुळे डोंगकड्यांपासून सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. येथून मलंग पर्वत स्पष्ट पाहता येतो आणि म्हणून या पॉईंटला मलंग पॉईंट हे नाव दिले आहे.

मलंगगड मौर्य राजा नलदेवने सातव्या शतकात बांधला. त्यावेळी नाथपंथी मच्छिंद्रनाथाचे येथे वास्तव्य होते असे म्हणतात. येथे मच्छिंद्रनाथाचे पुरातन मंदिर आहे. यास पूर्वी मच्छिंद्रगड म्हणत असत. हा किल्ला तीन पातळ्यावर बांधलेला असून सर्वात खालचे पठार येथे हाजी मलंग यांचा दर्गा आहे. हाजी मलंग हा सूफी संत होता. शांतता नांदण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पाच पीरांची कबर या माचीवर आहे म्हणून पीरमाची नाव पडले. वरच्या पातळीवर सोनमाची नंतर सर्वात उंचीचा किल्ल्याचा टप्पा बालेकिल्ला, तेथे पाण्याची दहा टाकी आहेत. गडावर बाबा हाजी मलंग यांची कबर आहे. बाबा मलंगच्या शेजारी त्यांच्या मुलीची कबर आहे. येथे वर्षातून एकदा उरुस होतो. कवरीवर चादर चढवण्याचा मान आजतागायत हिंदू समाजाच्या किल्लेदार केतकरांच्या वंशजांकडे पूर्वापार चालत आला आहे. माघ पोर्णिमेस मोठी यात्रा भरते. मलंग पॉईंटवरुन या मलंगगडाची सोनमाची, पीरमाची पठार दिसते.

Exit mobile version