‌‘इंडिया’च्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक शनिवारी ऑनलाइन पद्धतीनं पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी अध्यक्ष व्हावं, असा प्रस्ताव मांडला गेला होता. मात्र, नितीशकुमार यांनी हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. नितीशकुमार यांनी संयोजक होण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आजच्या बैठकीला 14 प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे या बैठकीत सहभागी झाले नव्हते.

लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची आजची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाकपचे नेते सीताराम येचुरी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते स्टॅलिन यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप, आघाडीच्या संयोजक पदी निवड यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीचं संयोजक होण्यास नकार दिला. मात्र, त्याचवेळी त्यांनी इंडिया आघाडी मजबूत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं.

Exit mobile version