| माणगाव | प्रतिनिधी |
माळरानावर, अडगळीच्या ठिकाणी, झाडांच्या बुंध्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान आकारांची भूछत्रं दिसू लागली आहेत. पाऊस सुरू झाला की ही भूछत्र सर्वत्र उगवलेली दिसतात. लहान-मोठ्या आकाराच्या उगवलेल्या या छत्र्या म्हणजेच छत्र उगवलेले कवक होत. या कवकांस कुत्र्याची छत्री, आलंबे, अळंबी, अलिंब अशा विविध नावाने ओळखले जाते. दिसायला आकर्षक व छत्रीच्या आकारासारखी पांढरे शुभ्र, काळसर असणारी, जाळीदार छत्रीसारखी, गदेच्या आकाराचे तर काही काड्यासारखी जाळीदार असतात.
भूछत्रे काही खाण्यासाठी योग्य, काही औषधी तर बहुतांश विषारी असतात. यांचा व्यास साधारणपणे आठ सेंटीमीटरपेक्षा जास्त नसतो. भूछत्रांच्या जगात 2000 जाती असून, त्यातील फारच थोड्या जातींची घरगुती अथवा व्यापारी प्रमाणावर लागवड होते. भूछत्र ही कवक असून, कवकांच्या वरच्या स्तरातील कोणत्याही खाद्य अथवा अखाद्य मांसल कवकाला भूछत्र असे म्हणतात. कोकणात साधारणतः आषाढ महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांनंतर पडणाऱ्या पावसात माळरानावर उगवून येणाऱ्या भूछत्रांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. आळंबी म्हणून ही भूछत्रे प्रसिद्ध आहेत. थोड्याच दिवसात मिळणारी ही भूछत्रे काही तास, एक ते दोन दिवसात पूर्ण उमळतात. ग्रामीण, शहरी भागात या भूछत्रांना चांगली मागणी असून, शंभर ते दोनशे रुपये वाट्याने ती विकली जातात. एका वाट्यावर आठ ते दहा आळंबी असतात. माळरानावर सर्वत्र उगवणारी ही भूछत्र विषारी वर्गातील असतात. गावांमध्ये, अडगळीच्या जागेत उगवणारी सर्वसाधारण वर्गातील भूछत्रे ही अतिविषारी नसली तरी त्यांचा खाण्यासाठी उपयोग होत नाही. लहान मुले नेहमीच या भूछत्रांचा उपयोग खेळण्यासाठी करत असतात.
आषाढ महिन्यातील शेवटी शेवटी पडणाऱ्या पावसातील भूछत्रांची सर्वसामान्यांना भुरळ असून, अतिशय स्वादिष्ट आरोग्यदायी म्हणून अनेक जण या भूछत्राची (अळंबी) खाण्यासाठी वाट पाहात असतात. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने भूछत्र ही उशिराने उगवली आहेत. मात्र, संततधार पावसामुळे अनेक ठीकाणी माळरान, अडगळीच्या ठिकाणी भूछत्रे उगवलेली दिसतात. अगदी नाजूक व काही तास, दिवस ही टिकतात. रंग, आकार, उंचीमुळे ही आकर्षक दिसतात.
सर्वच भूछत्रे खाण्यासाठी उपयुक्त नाहीत. काही ठराविक ऋतूतील, खास करून आषाढ महिन्यात पडणाऱ्या पावसात माळरानावर उगवणारी भूछत्रे म्हणजेच अळंबी खाण्यासाठी उपयुक्त असतात. यांचेही आकार प्रकार वेगवेगळे आहेत. काही जाड काडीची तर काही तंतू काडीची असतात. जाणकारांच्या महितीनेच त्यांचा खाण्यासाठी उपयोग करावा.
मंगला पवार, जाणकार विक्रेता
पावसाळी दिवसात अनेक ठिकाणी भूछत्रे उगवलेली दिसतात. ही सर्व कवके असून, ती विषारी व बिनविषारी असतात. यातील फारच थोडी भूछत्रे खाण्यासाठी औषधांसाठी उपयुक्त आहेत. यांचे आकार प्रकार वेगवेगळे असतात. दोन हजारांहून अधिक कवके आहेत.
राम मुंढे, पर्यावरण निरीक्षक, विज्ञान शिक्षक