| मुंबई | प्रतिनिधी |
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केले असून, त्यांना या पदावर बसण्याचा नैतिक तसेच कायद्यानुसार अधिकार नसल्याने त्यांना अपात्र ठरविले जावे, अशी जोरदार मागणी शेकापचे आ.जयंत पाटील यांनी मंगळवारी (दि.18) विधानपरिषदेत केली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही आ.जयंत पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आपले म्हणणे मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. यासाठी त्यांनी केंद्र आणि विविध राज्य सरकारचे दाखलेही देत नीलम गोऱ्हे या पदावर स्थानापन्न होण्यास कशा अपात्र ठरतात हे स्पष्ट केले. विधिमंडळाच्या सभापतींनी पक्षप्रवेश करण्याचा हा देशाच्या लोकशाहीतील पहिलाच प्रसंग असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. जी व्यक्ती या पदावर स्थानापन्न होते त्यावेळी ती कुठल्याही पक्षाची असत नाही. ती निपक्ष असते. नीलम गोऱ्हे यांनी पक्षप्रवेश केला आहे, तो सुद्धा विधिमंडळ आवारात. असा राजकीय प्रवेश करणे हे सुद्धा नियमाच्या विरोधात असल्याचेही पाटील यांनी सुचित केले. याबाबत आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन चर्चाही केलेली आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे ते म्हणाले.
याच मुद्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात घडलेल्या प्रसंगाची आठवण सांगितली. सन 2003 मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारने अणुस्फोट घडवून आणला होता. त्यावेळी लोकसभाध्यक्षपदी असलेल्या सोमनाथ चटर्जींना माकपच्यावतीने व्हीप बजावण्यात आला होता. पण त्यांनी तो व्हीप नाकारला. मी आता कोणत्याही पक्षाचा नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले होते. त्यानुसार आता नीलम गोऱ्हे या उपसभापतीपदावर स्थानापन्न झाल्यात त्याही कोणत्याही पक्षाच्या असूच शकत नाही, असे ते म्हणाले.