। बिजींग । वृत्तसंस्था ।
भारताच्या मालविका बनसोडने चीनमधील चांगझोऊ येथे सुरू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत मोठा उलटफेर केला आहे. तिने स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पॅरिस ऑलिम्पिक 2024 इंडोनेशियाच्या कांस्यपदक विजेती ग्रेगोरिया तुनजुंगचा पराभव केला आहे.
या सामन्यात इंडोनेशियाच्या जागतिक क्रमांक 7 बॅडमिंटनपटूला फेव्हरेट मानले जात होते. पण भारताच्या मालविका बनसोडने चमकदार कामगिरी करत हा सामना 26-24, 21-19 असा सरळ सेटमध्ये जिंकला. हा तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय आहे. 23 वर्षीय मालविकाने पहिल्याच गेमपासून तुनजुंगवर दबाव आणला. तिने एका वेळी 18-12 अशी आघाडी घेतली आणि गेम जिंकण्याच्या जवळ पोहोचली. पण इथे तुनजुंगने पुनरागमन करत अखेरच्या मिनिटाला 8 गुण मिळवत सामना टायब्रेकरवर नेला. मालविकाने हा टायब्रेकर 26-24 असा जिंकून सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरा गेम 21-19 असा जिंकला
तुनजुंगने दुसर्या गेममध्ये शानदार खेळ केला आणि पहिला गेम गमावल्यानंतरही दुसर्या गेममध्ये कडवी झुंज दिली. या गेमच्या शेवटच्या क्षणी दोन्ही खेळाडू समान गुणांवर होते (19-19). यानंतर मालविकाने सलग 2 गुण घेत 21-19 असा विजय मिळवला. यावेळी चायना ओपनमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उलटफेर आहे.