30 किलो गोमांस व स्कुटी जप्त
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्येवर कायदेशीर बंदी असतानाही अशा बेकायदेशीर कृत्यांचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा व महाड तालुक्यांमध्ये गोवंश हत्येचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र असून, श्रीवर्धन पोलिसांनी वेळेवर कारवाई करत गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.
श्रीवर्धन शहरालगत असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीतील मेटकर्णी परिसरात काही इसम बाहेरुन गोमांस आणून विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता, गुरुवारी दुपारी सुमारे पावणे चार वाजता शौकत गुलाम काझी ( रा. मेटकर्णी परिसर) हा टीव्हीएस कंपनीच्या स्कुटीवरुन अंदाजे 30 किलो वजनाचे गोमांस घेऊन जात असल्याचे आढळून आले.
भट्टीचा माळ परिसरात पोलीस शिपाई तुषार रामभाऊ आठरे यांनी आरोपीची स्कुटी अडवून तपासणी केली असता, त्याच्याकडे गोमांस असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी पंचनामा करुन पोलिसांनी गोमांसासह संबंधित स्कुटी ताब्यात घेतली. या कारवाईदरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन लकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस शिपाई तुषार आठरे यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन लकडे व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड हे करीत आहेत. दरम्यान, या प्रभावी कारवाईबद्दल विश्व हिंदू परिषदेचे रायगड जिल्हा मंत्री जितेंद्र करंजकर यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. यापुढेही तालुक्यासह रायगड जिल्ह्यात अशा प्रकारेच काटेकोरपणे गोवंश हत्या बंदी कायदा राबवावा, अशी मागणी केली आहे.







