। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलमधील पटेल मोहल्ला परिसरात 44 वर्षीय व्यक्तीवर तिघांनी धारदार शस्त्राने आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला करुन त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हत्या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव सलीम अनवर शेख (44) असे असून, तो पनवेल मधील पटेल मोहल्ला परिसरात राहण्यास होता. मृत सलीम शेख याचे त्याच परिसरात राहणार्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. प्रेयसीच्या नातेवाईकांसोबत केलेल्या असभ्य वर्तनाचा आणि पूर्ववैमनस्याचा राग मनात धरुन आरोपींनी सलीमची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. पनवेल येथील पटेल मोहल्ल्यातील मशिदीजवळ आरोपींनी सलीम शेख याला गाठले. त्यानंतर मुख्य आरोपी शाहनवाज अलताफ शेख याने सलीमच्या पाठीवर धारदार शस्त्राने एकापाठोपाठ एक असे 4 ते 5 वार केले. तसेच त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत केली. तर आरोपी सलीम खमु शेख आणि अलताफ शेख यांनी सलीमला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन तिथून पळ काढला होता. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सलीमला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानुसार पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यापैकी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय अस्पदवार करीत आहेत.
Panvel Crime: पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या; दोघे जेरबंद
