रोहा- मुरुड आणि अलिबाग तालुक्याशी जोडणाऱ्या मांदाड खाडी पुलाला तडे

पुलाच्या खाली अवैध रेती उत्खन होत असल्याने सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता : धनराज गायकवाड

बोरघर / माणगांव I विश्वास गायकवाड I

रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टीने सर्वार्थाने सोईस्कर पणे रोहा, मुरुड आणि अलिबाग तालुक्याला जोडणाऱ्या तळा तालुक्यातील मांदाड खाडी वरील मोठ्या पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेल्यामुळे सदर पुलास धोकादायक स्थिती निर्माण झाली असून या ठिकाणी संभाव्य मोठा अपघात होऊन महाड सावित्री पुलाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकतो. असे धनराज गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सदर पुलाच्या खाली आणि आजूबाजूच्या खाडी परिसरात शंभर ब्रास रॉयल्टी च्या परवानगी खाली हजारो ब्रास रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असल्यामुळेच या पुलाला तडे गेले असावे असे शेतकरी कामगार पक्षाचे तळा तालुका चिटणीस तथा गोर गरीब जनतेच्या सुख दुःखात तत्परतेने धावून जाणारे तळा तालुक्यातील लोकप्रिय डॅशिंग नेते धनराज गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपले ठाम मत व्यक्त आहे.

सदर संभाव्य धोकादायक बाब शेतकरी कामगार पक्षाचे तळा तालुका चिटणीस धनराज गायकवाड हे तळा तालुक्यातील मांदाड विभागातील एका कार्यक्रमाच्या दौर्यावर असताना यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर पुलाचे निरिक्षण केले असता सदर पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेले असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी सदर पुलाचे फोटो काढून सदर गंभीर बाब शेतकरी कामगार पक्षाचे त्यांचे वरिष्ठ नेते आमदार पंडित शेठ पाटील यांच्या कानावर घालून तालुक्यातील पत्रकारांची पत्रकार परिषद घेऊन मिडिया समोर आणली आहे.

सदर पत्रकार परिषदेत धनराज गायकवाड यांनी संबंधित विभागाने सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून सदर पुलाच्या दैनंदिन वाहतूकी बाबत निर्णय घेऊन पुढील उपाययोजना कराव्यात असे सुचवले असून त्याच बरोबर त्यांनी सदर पुलाच्या खाली खाडी परिसरा मध्ये वाळू माफियांकडून आजूबाजूला सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर प्रशासनाने तात्काळ कठोर निर्बंध आणावेत या संदर्भात तळा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळा तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात येणार आहे.

Exit mobile version