जत्रा भरली, 300 दुकानें थाटली, करोडोंची उलाढाल
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
आयएसओ मानांकन प्राप्त व महाराष्ट्रातील प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीतील श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सव रविवार (ता.22) ते गुरुवार (ता.26) पर्यंत साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यासह महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक आपल्या गणरायाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पालीत येतात. पहाटे 3 वाजल्यापासून गणेशभक्त पायी चालत येऊन बाप्पाचे दर्शन घेण्यात धन्यता मानत आहे. या उत्सवात जत्रा भरत असल्याने व्यववसाईक दृष्टया करोडोची उलाढाल होते. मासोत्सवासाठी पालीनगरी सजली असून सर्वत्र सर्वत्र चैत्यन्य व भक्तिमय वातावरण पहायला मिळत आहे. यानिमित्त पालीत मोठी जत्रा सुद्धा भरली आहे. तसेच विविध राजकीय पक्षाचे पुढारी व नेतेगण यांचे माघी उत्सवाच्या शुभेच्छा बॅनर थाटले आहेत.
भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने उपाययोजना केल्या आहेत. याबाबत नियोजन बैठक पाली तहसील कार्यालयात तालुक्याचे तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. तहसीलदार यांनी सर्व प्रशासकीय अधिकार्यांकडून तसेच बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून नियोजनाची माहिती घेवून मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिली. राज्य परिवहन मंडळाकडून अतिरिक्त गाड्यांची सोय करण्यात आली असून त्याचे आरक्षण करण्यासाठी पाली बसस्थानक तसेच मंदिर परिसरात देखील एक विशेष सोय केली आहे. मंदिर प्रशासन तसेच पाली नगरपंचायतकडून यात्रेकरूंच्या सोयीसाठी तसेच याकालावधीत स्वच्छता राहावी म्हणून नगरपंचायती कडून पाणी आणि स्वच्छता, जागोजागी कचराकुंड्या याची व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर सोईसीसुविधा
दर्शन मंडपाची व्यवस्था देवस्थानकडून करण्यात आली आहे. भाविकांकरिता उत्सवापूर्वी नवीन शौचालये देखील बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर रुग्णवाहिका, डॉक्टर, अग्निशमन वाहन, पाण्याचे टँकर, लाईट जनरेटर याची देखील सोय नियोजन बद्ध करण्यात आली असल्याचे देवस्थान चे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सांगितले.
वाहतूक व्यवस्था
या कालावधीत गावातील वाहतूक कोंडी रोखाण्यासाठी उपयोजना करण्यात आली आहे. मोठ्या वाहनांची वाहतूक गावाबाहेर थांबविण्यात आली आहे. त्याबरोबर उंबरवाडी येथे तसेच वाकणच्या दिशेने धारिया यांच्या जागेत आणि झाप गावाकडे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून तेथून भाविकांना आणण्यासाठी रिक्षांची मोफत सोय मंदिर पार्किंग पर्यंत करण्यात आली आहे.
यात्रा भरली
उत्सवात विविध प्रकारची 200 ते 300 दुकाने झाली आहेत. छोटे दुकानदार, फेरीवाले, हातगाडीवाले सुद्धा आले आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना व हौशी तरुण व तरुणींसाठी आकाश पाळणे, झुकझुक गाडी, घोडागाडी, आकाश पाळणा, मौत का कुआ, असे अनेक प्रकारचे मनोरंजक खेळ आले आहेत.
मंदिरला विद्युत रोषणाई
उत्सवानिमित्त मंदिर व मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर तलावा भोवती संतांच्या व इतर मुर्त्या व देखावे लावले आहेत. तिथेही अभिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कारंजे देखील आहेत. रोंगोळी काढण्यात आली आहे. फुलांच्या हारांनी सजावट केली आहे. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक मोठी कमान बसवण्यात आली आहे.
मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी विशेष मेहनत घेतली आहे. भाविकांसाठी मोफत नाश्ता तसेच प्रसादाची सोय करण्यात आली असून त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य पार्किंग देखील आहे. तेथे मोफत पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला आहे. – जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट