। रेवदंडा । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील मांडळा ते काकळघर या दहा किमी अंतरावरील मार्गातील मांडळा व काकळघर दोन्ही पुल दुरावस्थेने धोकादायक बनल्याने मांडळा ते काकळघर मार्ग अवजड वाहतुकीस बिकट ठरला आहे.
तालुक्यात बोर्ली नजीक मांडळा ते काकळघर या मार्गात मांडळा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत येत असलेला, जिल्हा परिषद अखत्यारीतील मांडळा पुल हा अत्यंत दुरावस्थेत असल्याने अवजड वाहतुकीस धोकादायक असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणले. या पुलाचा खालील बाजूस क्रॉकिटला तडा गेल्याने, मांडळा पुल केव्हाही पडेल यांची भिती स्थानिक ग्रामस्थांच्या मनात घर करून आहे. या संदर्भात मांडळा ग्रामपंचायतीचे वतीने संबधीताना निवेदन पत्रे देण्यात आली आहेत. तसेच स्थानिक आमदार तसेच विविध पक्षीय नेते मंडळीना पुलाच्या दुरावस्थेची पहाणी स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत मांडळा यांच्या समवेत केली. परंतू अदयापी या पुलाच्या दुरावस्थेबाबत, दुरूस्तीबाबत, व पर्यायी पुलाचे बाबत कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत. याबाबत येथील ग्रामस्थांचेवतीने या पुलाचे संबधीताना निवेदन पत्र देण्यात आली आहेत,मात्र संबधीत या पुलाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.
या दोन पुलाचे मार्गात मांडळा ग्रामपंचायत हद्दीतील मांडळा, महाळुंगे खुर्द, तसेच काकळघर ग्रामपंचायत हद्दीतील काकळघर, वांदेली, पारगाण, महाळुंगे बुद्रुक, डाकेली, महाळुंगे ठाकूरवाडी, पारगाण ठाकूर वाडी ही गावे येत आहेत, भविष्यात मांडळा पुलाचे पडझड झाल्यास वरील सर्व गावाचे संपर्क पावसाळी दिवसात तुटणार आहे. तसेच पुलाची पडझड झाल्यास काकळघर गावाचा संपर्क तुटणार आहे. त्यामुळे मांडळा व काकळघर पुलाचे दुरावस्थेबाबत संबधीतानी लक्ष्य देणे गरजेचे आहे. तसेच अवजड वाहतुक त्वरीत बंद करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.