बेकायदा वाळू वाहतूकीवर मांडवा पोलिसांची कारवाई

4 लाख 80 हजार रुपयांचा साठा जप्त

| अलिबाग | प्रतिनिधी |

बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मांडवा पोलिसांनी रविवारी दुपारी कारवाई केली. या कारवाईत 4 लाख 80 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

आप्पासाहेब कोळी असे या ट्रक चालकाचे नाव आहे. मांडवा बंदराजवळील समुद्रातील वाळू ट्रकमध्ये भरून तो रविवारी दुपारी अलिबागकडे घेऊन जात होता. मांडवा सागरी पोलिसांनी दस्तुरी नाका येथे सापळा रचून ट्रक अडविला. मात्र ट्रक तसाच रस्त्याच्या बाजूला ठेवून चालक तेथून पसार झाला. समुद्रातील वाळू अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात मांडवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ट्रकसह वाळू पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत अधिक तपास करीत आहेत.

मांडवा बंदरापासून काही अंतरावर समुद्रात बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन करून तिची वाहतूक केली जात होती. स्थानिकांनी अनेक वेळा महसूल विभागाकडे तक्रारी करून देखील उत्खनन करणाऱ्यासह वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मांडवा सागरी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version