मातृछाया कुर्डूस विजेता तर मरीदेवी धेरंड उपविजेता
| खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील टाकादेवी स्पोर्ट क्लब मांडवा व ग्रामस्थ मांडवा आयोजित रायगड जिल्हास्तरीय पुरुषांच्या भव्य कबड्डी स्पर्धेत मातृछाया संघ कुर्डूस स्वर्गीय रुची पाटील स्मृती चषक 2024चा विजेता ठरला. मरीदेवी धेरंड संघाने द्वितीय, श्री गणेश दिवलंग तृतीय तर चतुर्थ क्रमांक नवतरुण करावी संघाने पटकावला. या स्पर्धेत उत्कृष्ट चढाई पार्थ ठाकूर दिवलांग व उत्कृष्ट पकड रोहित मोकल करावी व पब्लिक हिरो ऋतिक पाटील मरी देवी संघ तसेच स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू समाधान मोरे ठरला. कुर्डूस क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या खेळाडूंना आकर्षक बक्षिसे व पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर स्पर्धा टाकादेवी क्रीडानगरीच्या भव्य मैदानात पार पडली. प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरी व मान्यवरांसाठी मोठं व्यासपीठ निर्माण करण्यात आले होते.
सदर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या. स्पर्धेचा शुभारंभ रणजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आला. रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील 32 नामवंत संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धेच्या वेळी जिल्हा राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या खेळाडूंचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. स्पर्धेचे समालोचन अंकुर घरत यांनी केले. सदर स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने क्रीडा प्रेक्षक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.