श्रावणातील प्रत्येक मंगळवारी केली जाते पूजा
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रावण मासातील मंगळागौर पूजन हे हिंदू धर्मातील एक व्रत वैकल्य समजले जाते. नवविवाहित स्त्रिया लग्न झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षे मंगळागौरीचे व्रत करतात. तसेच, मंगळागौरीची पूजा श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केली जाते. मंगळागौर हे आईने मुलीला लग्नानंतर दिलेले सौभाग्य व्रत असल्याचेही मानले जाते. नवविवाहितेला अखंड सौभाग्य व तिच्या सासर माहेरास सुखसमृद्धी लाभावी म्हणून हे व्रत केले जाते. या दिवशी पार्वती देवीची पूजा करुन जागरण केले जाते. जागरणात पारंपारिक खेळ खेळले जातात.
पूजेसाठी वेगवेगळ्या झाडांची पाने व फुले वाहिले जातात. यामध्ये अर्जुन सादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दूर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती, केवडा ही सर्व सोळा पत्री वाहिली जातात. सर्व काही मंगल होवो घरात सुख संपन्नता नांदो, गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करून सर्व काही मंगलदायी होवो यासाठी ही पूजा केली जाते. या दिवशी नवविवाहितांना बोलावून एकत्रित पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते. मंगळगौरीचे व्रत म्हणजे नवविवाहितेसाठी उत्साहाची, आनंदाची पर्वणी असते. आपली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारे हे व्रत स्त्रियांना रोजच्या जीवनापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची संधी देते. पूर्वीच्या काळी स्त्रियांचे जीवन चुल मूल इथपर्यंतच मर्यादीत होते. त्यामुळे अशा सणांना महिलांना आपली पारंपरिक खेळाची ही हौस पुरवते.
मंगळागौरीचे पारंपरिक खेळ
मंगळागौर वेळी पारंपरिक खेळ खेळले जाते. या खेळाचा मुख्य हेतू आपल्या संस्कृतीची ओळख या नव्या पिढीला झाली पाहिजे. तसेच व्यायाम देखील व्हायला हवा. हे खेळ खेळल्याने चपळता मिळते, चैतन्य आणि आनंद देणारे असे हे मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आहेत. या सर्व खेळामुळे शरीराच्या विविध अवयवांचा व्यायाम होतो. खेळामध्ये खेळले जाणारे खेळ म्हणजे वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सुपलं, सासू-सून भांडण, अडवळ घुमा पडवळ घूम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा हे सर्व खेळाचे प्रकारांचा समावेश यात असतो. साधारणपणे एकशे दहा प्रकाराचे खेळ यामध्ये खेळले जातात. एकवीस प्रकारच्या फुगड्या, सहा प्रकाराचे आगोटा-पागोटा असतात.
