। श्रीवर्धन । वार्ताहर ।
ठाणे येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आयोजित ‘जागर परंपरेचा, उत्सव मंगळागौरीचा’ या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन बुधवारी (दि.21) करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 60 संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्रीवर्धन येथील नटेश्वर ग्रुप चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरला. पाच मिनिटांच्या अवधीत याा ग्रुपने फुगडी, झिम्मा, बसफुगडी, पिंगा, गाठोडे अशा विविध 48 मंगळागौरीच्या खेळांचे सादरीकरण केले.
श्रावण महिना उजाडल्यावर या महिन्यातील चारही मंगळवारी मंगळागौर खेळ महिलांकडून खेळला जातो.धावपळीच्या युगात महिलांना या खेळाला मुकावे लागते.वेळेअभावी हे खेळ लोप पावत चालले आहेत. नवीन पिढीला मंगळागौरीच्या खेळांबद्दल माहिती व्हावी तसेच पारंपरिक खेळ खेळले जावे याकरिता अनेक ठिकाणी या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. तर, शहरातील महिला वर्गाला मंगळागौर या खेळाची अधिक माहिती मिळावी व या खेळाचा प्रसार व्हावा यासाठी संस्थांमार्फत स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.