| रसायनी | वार्ताहर |
पनवेल एसटी बस स्टँडमधील बसमध्ये चढत असताना 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्पा धनावत ह्या रसायनीतील वाशिवली येथे राहत असून त्या व त्यांचे पती चष्मा दुरुस्त करण्यासाठी रसायनी येथून एसटी बसने पनवेल येथे आल्या होत्या. ओरियन मॉल येथे चष्म्याचे काम करून दोघे रसायनीला जाण्यासाठी दुपारी एसटी स्टँडवर आल्या आणि वाशीवली येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची गर्दी होती. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना फोन आल्याने फोन उचलत असताना फोनच्या स्क्रीनमध्ये चेहरा दिसला. यावेळी गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र नसल्याचे दिसून आले. त्यांनी आजूबाजूला मंगळसूत्राचा शोध घेतला. अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची वाटी असलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. बस स्थानकात एसटीमध्ये चढताना अनेक महिलांच्या दागिने यापूर्वी देखील चोरीला गेलेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.