| माणगाव | वार्ताहर |
कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव या संस्थेची सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक दि.30 एप्रिल रोजी बिनविरोध संपन्न झाली. या संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करीत 18 पैकी 12 जागांवर संचालक हे बिनविरोध निवडून आले असून 4 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर 2 जागांवर शिवसेनेचे संचालक निवडून आले आहेत. त्यानंतर या संस्थेच्या सभापती व उपसभापती यांची निवड गुरुवार (दि.18) मे रोजी संस्था कार्यालय माणगाव येथे घेण्यात येणार असल्याचे या निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निरडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेकापचे अल्लाउद्दीन उमर सनगे, महेश गजानन सुर्वे, हसनमिया अ. लतीफ बंदरकर, नरेश लक्ष्मण दळवी, दिलीप उतेकर, अँड. कौस्तुभ धामणकर, रमेश मोरे, गौरी पयेर, नाझनीन राऊत, सुषमा रिकामे, विनायक गिजे, स्वप्नील दसवते हे 12 संचालक बिनविरोध निवडून आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत गोरेगावकर, अंकुश गोळे, सचिन किर, परशुराम पवार हे 4 तर, शिवसेनेचे प्रमोद घोसाळकर व संतोष मेथा हे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर आता संपूर्ण माणगाव तालुक्याचे लक्ष संस्थेच्या सभापती व उपसभापती निवडणुकीकडे लागून राहिले आहे. या संस्थेवर शेकापचे सर्वाधिक संचालक निवडून आल्याने शेकापचा संचालक सभापती पदावर विराजमान होणार हे निश्चित असून शेकापने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केले आहे. या संस्थेच्या सभापती पदी शेकापच्या कोणत्या संचालकाची निवड होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.