पाच वर्षांत एकही खड्डा नाही; 246 कोटी रुपये खर्च, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
। माणगाव । प्रतिनिधी ।
कोकणातील रखडलेला, खड्डेमय झालेला, अर्धवट असलेला, अद्यापही कामं सुरू असलेला, रस्त्याची चाळण झालेला, आंदोलने सुरू असलेला, प्रवाशांच्या गैरसोयीचा असलेला, पर्यटकांची हाडे खिळखिळी करून टाकत असलेला, प्रवाशांची ओरड आणि बोंबाबोंब सुरू असलेला, अपघातांचे कारण ठरलेला, शेकडो जणांचे नाहक बळी घेणारा आणि कायमस्वरूपी अपंगत्व आणणारा मुंबई ते गोवा महामार्ग पाहिला तर हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र दिसत आहे. याला अपवाद ठरलाय तो माणगाव शहरातून जाणारा माणगाव ते दिघी महामार्ग.
या रस्त्याचे संपूर्णपणे मजबूत काँक्रिटीकरण आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम जे.एम. म्हात्रे प्रा.लि.कंपनी या पनवेल येथील अनुभवी ठेकेदाराने घेतले होते. त्यांनी ते प्रामाणिकपणे वेळेत पूर्ण केले. या महामार्गाची थेट 2017 साली सुरुवात करण्यात आली. हा महामार्ग पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आला आहे. या रस्त्याचा पाया सहा फूट खोल खणण्यात येऊन डबर, मोठी खडी, लहान खडी, वाळू, ग्रीट, उच्च दर्जाचे सिमेंट वापरले गेले आहे. हे करताना वारंवार रोलरचा वापर करून दाब देऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.
हा मार्ग मूळ जमिनीपासून चार फूट उंच करण्यात आल्याने महापुरात या मार्गावर पुराचे पाणी शिरले नाही. यापूर्वी या मार्गावर दरवर्षी पुराचे पाणी तुंबून मोर्बा पूल बंद करण्यात येत असल्याने शेकडो गावांचा काही दिवस संपर्क तुटत होता. आता एकदाही मोरबा पुलावरून पाणी गेले नाही हे विशेष ठरले. या मार्गावरील मोरबा, साई आणि म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात अत्यंत तीव्र उतार आणि चढणी होत्या. त्यांचे सपाटीकरण करून हा घाट वाहतूक आणि दळणवळणास सोपा तसेच सुलभ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शेकडो छोटे मोठे पूल, साकव आणि मोऱ्या बांधण्यात आल्या. एकाच वेळी माणगाव, मोरबा, साई, म्हसळा आणि दिघी या ठिकाणी बांधकामे सुरू करण्यात आली. त्यामुळे हा महामार्ग वेळेत पूर्ण होण्यासाठी मदत झाली. प्रत्येक गावाच्या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त केले. या महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी एकूण 246 कोटींची तरतूद करण्यात आली होती.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर दुतर्फा सुमारे एक लाख झाडे वनखात्याच्यावतीने लावण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत हा महामार्ग हिरवाईने नटलेला दिसणार आहे. तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी गतिरोधक, रिफ्लेक्टर, ठिकठिकाणी मार्ग फलक, रात्री चमकणारे पांढरे पट्टे तयार करण्यात आले आहेत. या महामार्गासाठी 1965 सालातच शेतकर्यांना जमीन मोबदला देऊन बहुतेक जमीनी संपादीत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रस्ता बांधकाम करणे सुलभ आणि सोपे झाले. या महामार्गासोबतच इंदापूर ते दिघी हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. आता दिघी येथे आंतरराष्ट्रीय बंदराला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा आणि मुरुड हे तालुके विकासाच्या नव्या महामार्गावर येऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. भविष्यात दिघी ते माणगाव रेल्वे मार्ग आणि चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या सर्व भूभागाचा विकासात्मक कायापालट होणार आहे हे जाणून कौशल्य विकास आधारीत कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. जेणेकरून स्थानिक पातळीवर रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे.