काम अंतिम टप्प्यात, विद्यार्थी-नागरिकांची गैरसोय दूर होणार
| नागोठणे | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठण्यातील रुची हॉटेल व कोकण एज्युकेशन सोसायटीच्या बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलाला जोडणार्या महाकाय पादचारी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे हा पूल लवकरच विद्यार्थी व नागरिकांसाठी खुला होणार असून, महामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय व अपघाताचा धोका दूर होणार आहे. मात्र, याआधीच रेल्वे ट्रॅकवर अस्तित्वात असलेल्या दहा फूट रुंदीच्या रेल्वेच्या उड्डाण पुलाला जोडणार्या या नवीन पादचारी पुलाची रुंदी कमी केल्याने पालक-विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे महामार्गावर वाहनांची संख्या व वेगही वाढणार असल्याने कोएसोच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणार्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना त्रास होत आहे. दोन सत्रांमध्ये चालणार्या बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलातील सकाळच्या सत्रातील अकरावी, बारावीचे विद्यार्थी दुपारी 12 वाजता सुटतात. तर, दुपारच्या सत्रातील पहिली ते 10 वीपर्यंतचे विद्यार्थी सायंकाळी 5 वाजता सुट्टी झाल्यानंतर हे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने रेल्वेच्या पुलानंतर त्याला जोडलेल्या महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या याच पादचारी पुलावरून जाणार आहेत. या दोन्ही पुलांना जोडणारा पट्टाही कमी रुंदीचा ठेवण्यात आला आहे. तसेच नवीन पुलाच्या मध्यावर आधार देण्यासाठी उभारण्यात आलेले पोलादी खांब हे कमी आकाराचे असल्याने भविष्यात काही धोका तर निर्माण होणार नाही ना, अशी भीती पालकवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात पुलाचे काम करणार्या कर्मचार्यांशी चौकशी केली असता आमच्या कंपनीला पुरविण्यात आलेल्या डिझाईनप्रमाणेच या नवीन पुलाचे काम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या पुलाची रुंदी पुरेशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलात जाण्यासाठी असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाला जोडूनच महामार्गावर नव्याने उड्डाणपूल उभारण्यात यावा, असे निवेदन यापूर्वीच देशपांडे विद्यासंकुलाने दिले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तत्कालीन प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे व कार्यकारी अभियंता तसेच महामार्ग चौपदरीकरण कामाचे ठेकेदार यांनी हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले होते.