कसोटी क्रिकेटच्या इतिहासात विक्रमी धावांची नोंद
। कानपूर । वृत्तसंस्था ।
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये कहर करत आहे. एवढं की याच्यापुढे इंग्लंडची प्रसिद्ध ‘बेझबॉल’ शैलीदेखील फेल ठरली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीतील पहिल्या डावात भारताने अशी फलंदाजी केली आहे की, जी इतिहासात यापूर्वी कधीच झाली नव्हती. भारताने या डावात सर्वात वेगवान 50 धावा, सर्वात वेगवान 100 धावा, सर्वात वेगवान 150 धावा, सर्वात वेगवान 200 धावा आणि सर्वात वेगवान 250 धावांचा विक्रम मोडला आहे. आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने या धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावे झाला आहे.
भारतीय संघाने दुसर्या कसोटीच्या पहिल्या डावाता 9 बाद 285 धावा करून डाव घोषित केला. कानपूर कसोटीचे अडीच दिवस पावसामुळे वाया गेले. यानंतर चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर गुंडाळला गेला. बांगलादेशकडून मोमिनूल हकने 194 चेंडूंत 107 धावांची नाबाद खेळी केली. पण, संपूर्ण संघ 233 धावांत तंबूत परतला. जसप्रीत बुमराहने 3 बळी तर मोहम्मद सिराज, आकाश दीप व आर.अश्विन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या भारताने 52 धावांची आघाडी घेत डाव घोषित केला. यात यशस्वी जयस्वालने (51 चेंडूत 72 धावा) प्रथम कर्णधार रोहित शर्मासह (11 चेंडूत 23 धावा) तुफानी सलामी दिली. यानंतर विराट कोहली (35 चेंडूत 47 धावा) आणि केएल राहुल (43 चेंडूत 68 धावा) यांनी ही लय कायम ठेवली. शुबमन गिलने देखील 36 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. अखेरीस आकाशदीपने 5 चेंडूत 12 धावा ठोकल्या. त्याने सलग 2 चेंडूवर 2 षटकार हाणले. अशाप्रकारे भारतीय संघानं अवघ्या 34.4 षटकांत 285 धावा ठोकल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने त्यांच्या दुसर्या डावात 26 धावांवर दोन गडी गमावले होते. ते भारतीय संघाच्या पहिल्या डावातील आघाडीपासून अजूनही 26 धावा मागे आहेत.
तेंडुलकरचा ‘विराट’ विक्रम मोडला
या सामन्यात विराट कोहलीने अवघ्या 35 चेंडूत 47 धावा ठोकल्या आहेत. याचबरोबर विराट कोहलीने 594 सामन्यांत 27 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडून सचिन तेंडुलकरचा (623 सामने) विश्व विक्रम मोडला आहे. त्याने 114 कसोटीत 8 हजार 871 धावा, 295 एकदिवसीय सामन्यांत 13 हजार 906 धावा आणि 125 टी-20 सामन्यांत 4 हजार 188 धावा केल्या आहेत.
जैस्वालची ‘यशस्वी’ खेळी
या सामन्यात रोहित बाद झाल्यानंतर जैस्वालने गिलबरोबर फलंदाजी करताना आक्रमक खेळ सुरू ठेवला होता. जैस्वालने गिलबरोबरच्या भागीदारीदरम्यान त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. त्याने अवघ्या 31 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. यामुळे भारताकडून हे कसोटीतील चौथ्या क्रमांकाचे सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. पण अर्धशतकानंतर तो 51 चेंडूत 72 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.
जडेजाचा विक्रमी बळी
या सामन्यात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने मोठे विक्रम केले आहेत. बांगलादेशचा शेवटचा बळी जडेजाने घेतला. त्याने 75 व्या षटकात आपल्याच गोलंदाजीवर खलीद अहमदचा झेल घेत बांगलादेशचा डाव संपवला. जडेजासाठी हा बळी विक्रमी ठरला आहे. कसोटी कारकिर्दीतील हा 300 वा बळी ठरला आहे. तसेच, कसोटीमध्ये 300 बळी घेणारा तो भारताचा सातवा गोलंदाज ठरला आहे. जडेजा सर्वात कमी चेंडू टाकून 300 बळी घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज तर पहिल्या क्रमांकावर आर अश्विन आहे.
3 षटकांत 50 धावा
10.1 षटकांत 100 धावा
18.2 षटकांत 150 धावा
24.2 षटकांत 200 धावा
30.1 षटकांत 250 धावा