मेहनतीच्या बळावर कमावली वर्दी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
बिकट परिस्थितीत जिद्द, आत्मविश्वास व कठोर मेहनतीच्या जोरावर सख्ये बहीण-भाऊ पोलीस खात्यात भरती झाले आहेत. शेतकरी वडिलांनी त्यांच्या या प्रगतीसाठीदेखील मोलाचा वाटा उचलला आहे. हे दोघे बहीण-भाऊ रोहा तालुक्यातील बाहेरशिव या छोट्या गावातील आहेत. शेतीची कामे व दूध विकून त्यांनी परिश्रम व अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. या दोघा बहीण-भावाचा हा थक्क करणारा प्रवास सर्वांसाठीच मार्गदर्शक ठरत आहे.
हर्षल कैलास पालांदे ठाणे पोलीस, तर भाग्यश्री कैलास पालांदे रायगड पोलीसमध्ये नुकतीच भरती झाली आहे. वडील शेतकरी असून, त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खूप मेहनत केली आणि अजूनसुद्धा करत आहेत. हर्षलने सांगितले की, ते एकूण पाच भावंडे, चार बहिणी आणि तो एक भाऊ. घरची परिस्थिती अतिशय बिकट असताना दोन्ही बहीण भावाने पोलीस व्हायचं ठरवलं. पण, पोलीस भरतीची कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे अधिक माहित काढून कोचिंग क्लास लावण्याचा निर्णय घेतला. पण, त्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. पण, कुठून तरी जमवाजमव केली, घरच्यांची परवानगी घेऊन, त्यांच्या सहमतीने पोलीस भरतीचा प्रवास सुरु झाला. मात्र, जबाबदार्या संपल्या नव्हत्या. शेती व घरचा दुधाचा धंदा सांभाळून सगळं करायचं होत. आम्ही दोघांनी ठाम निर्णय घेतला होता. कितीही अडचणी आल्या तरी आपण यावर मात करून पोलीस होणारच.
अथक परिश्रम
पहाटे चार वाजता उठून गोठा साफ करून म्हशींचे दूध काढून सहा वाजेपर्यंत दोघे भाऊ-बहीण हे दूध नागोठण्यामध्ये विकून त्यानंतर भरतीच्या क्लाससाठी 28 किलोमीटरचा प्रवास करून जात. सकाळी ग्राऊंड, लेक्चर व लॅब हे सगळं करून सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरी पोहोचत. सगळी कामं उरकून अभ्यास करायचे. शेतात पण सगळी काम करायचे. मनात फक्त एकच गोष्ट होती भरती व्हायचे अन् आपल्या आईवडिलांचे नाव छातीवर घेऊन फिरायचं.
अनेक अडचणी
डोळ्यांच्या कडा पुसत हर्षल सांगत होता, आमच्या संघर्षाच्या काळात अनेक अडचणी आल्या; परंतु, आम्ही हार मानली नाही. सर्व संकटांवर पुरून उरलो. वाईट काळात सगळ्यांनी साथ सोडली, पण आईवडील खंबीरपणे सोबत होते. आईवडिलांचं सोबत असणं, हीच जगातली सर्वात मोठी ताकद आहे. आणि, त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवून पहिल्या भरतीतच माझ्या ताईची भाग्यश्री पालांदे रायगड पोलीस दलात निवड झाली. तिच्या कष्टाचं चीज झालं. राहिला विषय माझा, तर मी दोन ठिकाणी अनुक्रमे 1 व 2 मार्क्सनी वेटिंगला राहिलो. भरपूर लोकांनी माझी लायकीसुद्धा काढली. पण माझा स्वतःवर विश्वास होता. ही गोष्ट पचवणं माझ्यासाठी अशक्य होती. परंतु, आपल्या बहिणीच्या खुशीत मी पण खूप खुश होतो. सगळीकडे भरपूर नाव झालं. गावातून पहिली पोलीस म्हणून माझ्या ताईचं नाव झालं. मीसुद्धा हार मानली नव्हती, पुन्हा नव्याने सुरुवात केली. ताईचा भरपूर सपोर्ट मिळाला. चारही बहिणी, आईवडील, अकॅडमीचे सर आणि मित्रपरिवार यांच्या पाठिंब्यामुळे मी दिवसरात्र मेहनत केली. आणि माझी ठाणे पोलीस दलात वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी निवड झाली. माझ्या आयुष्यातील ते पहिलं यश होतं. 2021 ला चालू केलेला प्रवास 2024 ला संपला. ही तर सुरवात आहे. अजून पुढे खूप काही करायचं आहे, असे हर्षल म्हणाला.