माणगाव नगरपंचायतीची मान्सूनपूर्व कामांचे नियोजन तयार

गटार सफाईची कामे मार्गी लावणार : नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार
| माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव नगरपंचायतीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाच याचा नागरिकीकरणावरही परिणाम होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी बांधलेली घरे, भराव यामुळे पावसाळ्यात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे मार्ग कांही अंशी बदलले आहेत. त्यातच दिघी-माणगाव-पुणे हा रस्ता तयार केल्यामुळे रस्त्यालगत पाणी मोठ्या प्रमाणात साठत आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसते. त्याचबरोबर माणगाव शहरातील कांही ठिकाणी गटारे उघडी आहेत. तर कांही ठकाणी गटारे बंद आहेत. या गटारात मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने गटारे पावसाळ्यात तुंबून पाणी रस्त्यावर येते. यंदाच्या वर्षी नगरपंचायतीने मान्सूनपूर्व कामे हाती घेऊन कामांचा नियोजन तयार करून हि सर्व कामे 15 मे पर्यत पूर्ण करण्याचा नगरपंचायतीचा मानस असल्याचे नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले.

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. त्यावेळी नगरपंचायतीला मान्सूनपूर्व तयारीच्या कामाची माहिती देण्यात आली होती. त्याप्रमाणे पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याचा धोका लक्षात घेता 30 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या पक्के धोकादायक इमारतीची पाहणी करून धोका संभावणार्‍या इमारतीच्या मालकांना नोटीस देवून आवश्यकतेनुसार कारवाई करण्याची सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच मालकीचे असणारे धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी संबंधित मालकांना सूचना तसेच सार्वजनिक धोकादायक वृक्ष तोडणे, जीर्णोवृक्ष तोडण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. जेणे करून पावसाळ्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढावू नये म्हणून उपाययोजना करण्याच्या कामाकडे नगरपंचायतीने लक्ष घातले आहे.

माणगाव शहरात बसस्थानक, निजामपूर मार्गावरील रेल्वे पुलाखाली तसेच कचेरी मार्गावर, बामणोली मार्गावर, मोर्बा मार्गावर, उपजिल्हा रुग्णालयासमोर पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात तुंबते त्यामुळे महिला, वृद्ध, लहान मुले व प्रवासी नागरिकांना नाहक याचा त्रास सहन करावा लागतो. माणगाव शहरातील अनेक ठिकाणी बंद असणारी गटारे तर कांही ठिकाणी उघडी असणारी गटारात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक, कचरा व गाळ मोठ्या प्रमाणात साठला असून हि गटारे ठिकठिकाणी तुंबली आहेत. हि गटारे साफ करण्याचे काम लवकरच नगरपंचायत हाती घेणार असून हे काम 15 मे पर्यत पूर्ण करण्याचा नगरपंचायतीचा मानस आहे. जेणे करून गटाराचे पाणी रस्त्यावर येवू नये. तसेच पावसाच्या पाण्याचाहि निचरा व्हावा. यासाठी नगरपंचायतीने लक्ष घातले आहे. नगरपंचायतीने नेटक्या केलेल्या नियोजनामुळे यंदाच्या पावसाळ्यात गटाराचे पाणी रस्त्यावर येणार नाही अशी आशा नागरिकांना वाटत आहे. मान्सूनपूर्व विविध कामाचे नियोजन नगरपंचायतीने हाती घेतल्याने पावसाळ्यात उद्भवणार्‍या समस्येपासून नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

Exit mobile version