पाण्याच्या निचर्यासाठी विशेष लक्ष
। माणगाव । प्रतिनिधी ।
पावसाळा जवळ आल्याने माणगाव नगरपंचायतीने मान्सूनपूर्व कामाला गती दिली असून नगरपंचायत हद्दीतील गटारे साफ करण्यासाठी विशेष भर दिला असून पारंपारिक गटाराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी विशेष लक्ष घातले आहे. माणगाव बाजारपेठतील रस्यावर पावसाचे तुंबणार्या पाण्याचा मार्ग मोकळे करण्यावर भर दिला आहे. माणगावची लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाच याचा नागरिकीकरणावरही परिणाम होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी बांधलेली घरे, भराव यामुळे पावसाळ्यात पडणार्या पावसाच्या पाण्याचे मार्ग काही अंशी बदलले आहेत. त्यातच दिघी-माणगाव-पुणे हा रस्ता तयार केल्यामुळे रस्त्यालगत पाणी मोठ्या प्रमाणात साठत आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसते. त्याचबरोबर माणगाव शहरातील कांही ठिकाणी गटारे उघडी आहेत. तर कांही ठकाणी गटारे बंद आहेत. या गटारात मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने गटारे पावसाळ्यात तुंबून पाणी रस्त्यावर येते. यंदाच्या वर्षी नगरपंचायतीने मान्सूनपूर्व कामे हाती घेतली असून त्या कामाला वेग आला आहे.
माणगाव शहरात बसस्थानक, निजामपूर मार्गावरील रेल्वे पुलाखाली तसेच कचेरी मार्गावर, बामणोली मार्गावर, मोर्बा मार्गावर, उपजिल्हा रुग्णालयासमोर पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात तुंबते त्यामुळे महिला, वृद्ध, लहान मुले व प्रवासी नागरिकांना नाहक याचा त्रास सहन करावा लागतो. माणगाव शहरातील अनेक ठिकाणी बंद असणारी गटारे तर कांही ठिकाणी उघडी असणारी गटारात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक, कचरा व गाळ मोठ्या प्रमाणात साठला असून हि गटारे ठिकठिकाणी तुंबली आहेत. हि गटारे साफ करण्याचे काम नगरपंचायतीने हाती घेतले असून जेणे करून गटाराचे पाणी रस्त्यावर येवू नये. तसेच पावसाच्या पाण्याचाही निचरा व्हावा, यासाठी नगरपंचायतीने लक्ष घातले आहे. नगरपंचायतीने नेटक्या केलेल्या नियोजनामुळे यंदाच्या पावसाळ्यात गटाराचे पाणी रस्त्यावर येणार नाही अशी आशा नागरिकांना वाटत आहे. मान्सूनपूर्व विविध कामाचे नियोजन नगरपंचायतीने हाती घेल्यामुळे पावसाळ्यात उद्भवणार्या समस्येपासून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.