माणगाव पोलीस ठाण्याला ऐतिहासिक वारसा

108 वर्षांची जिवंत साक्षीदार

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहराच्या मध्यभागी उभी असलेली तहसीलदार कार्यालय आणि माणगाव पोलीस ठाण्याची ही ऐतिहासिक इमारत म्हणजे केवळ दगडांची रचना नसून, ती इतिहासाच्या असंख्य आठवणींची जिवंत साक्ष आहे. सन 1918 मध्ये इंग्रज सत्ताकाळात ब्रिटिश सरकारने उभारलेली ही भव्य इमारत आज तब्बल 108 वर्षांचा प्रवास पूर्ण करूनही तितक्याच दिमाखात उभी आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात ‌‘न्यू मामलेदार कचेरी’ या नावाने ओळखली जाणारी ही वास्तू, त्या काळच्या प्रशासकीय व्यवस्थेचे केंद्र होती. विशेष म्हणजे, त्या काळी तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाणे एकाच इमारतीत कार्यरत होते. काळाच्या ओघात जागेची कमतरता भासू लागल्याने तहसीलदार कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली, मात्र जुनी इमारत आजही तितक्याच मजबुतीने उभी आहे.

दगडी बांधकामात उभारलेली ही इमारत तिच्या भक्कमपणासाठी आणि अभेद्य रचनेसाठी ओळखली जाते. मोठ्या सळईंचा दरवाजा, मजबूत प्रवेशद्वारे आणि आत असलेले सागवान लाकडाचे खांब-वासे आजही त्या काळच्या कारागिरीची साक्ष देतात. विशेष बाब म्हणजे, या पोलीस ठाण्यातील अभेद्य कोठडीतून आजपर्यंत एकही कैदी पळून जाऊ शकलेला नाही, ही बाब या इमारतीच्या सुरक्षिततेचे प्रतीक आहे.

या वास्तूच्या भिंतींनी अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक आणि राजकीय नेत्यांना याच ठिकाणी अटक करून कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही इमारत केवळ प्रशासकीय केंद्र नसून, ती स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींनी भारलेली एक पवित्र भूमी आहे.
या इमारतीला तीन भव्य प्रवेशद्वारे असून, पूर्वी येथे अनेक सरकारी कार्यालये कार्यरत होती. त्याचबरोबर ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या निवासासाठी परिसरात उभारलेल्या दगडी चाळी आजही टिकून आहेत, ज्यामुळे या ठिकाणाला एक वेगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या ऐतिहासिक वास्तूला लागूनच विस्तीर्ण पोलीस परेड मैदान आहे, जे आजही शिस्त, प्रशिक्षण आणि शौर्याची परंपरा जपताना दिसते. याच परिसरात वीर योद्धा यशवंतराव घाडगे यांचे स्मृतीस्थळ असून, इंग्रज सरकारने उभारलेला त्यांचा पुतळा आजही अभिमानाने उभा आहे. हा पुतळा प्रत्येक नागरिकाला शौर्य, देशभक्ती आणि बलिदानाची प्रेरणा देत राहतो. अलीकडेच या इमारतीला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. मात्र, काळाच्या ओघात या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

माणगावच्या वैभवशाली इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेल्या या इमारतीचे संरक्षण व्हावे, तिचा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे या अमूल्य वारशाच्या जतनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Exit mobile version