| माणगाव | सलीम शेख |
पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी माणगाव नगरपंचायतीने केंद्र व राज्य शासनाच्या योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारलेली विद्युतदाहिनी गेल्या तब्बल पाच वर्षांपासून बंद अवस्थेत पडून आहे. अत्याधुनिक सुविधा म्हणून उभारण्यात आलेला हा प्रकल्प आज स्वतःच धूळ, गंज आणि निष्क्रियतेच्या विळख्यात अडकला असून शासनाच्या निधीची अक्षरशः राखरांगोळी झाल्याचे चित्र समोर आले आहे.
शहरातील नागरिकांना लाकडावरील पारंपरिक अंत्यसंस्काराला पर्याय म्हणून आधुनिक, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध व्हावी, वृक्षतोड कमी व्हावी तसेच अंत्यसंस्कार प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी या उद्देशाने विद्युतदाहिनीची उभारणी करण्यात आली होती. मात्र, उद्घाटनाच्या प्रतीक्षेतच हा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडला आणि अखेर पूर्णपणे बंद पडला.
या प्रकल्पाबाबत तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अनेक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी विद्युतदाहिनी तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आजही हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. परिणामी आत बसविण्यात आलेली महागडी यंत्रसामग्री धूळखात पडली असून अनेक भागांवर गंज चढला आहे. तांत्रिक यंत्रणा निकामी होण्याच्या मार्गावर असल्याने पुन्हा ती कार्यान्वित करण्यासाठी मोठा अतिरिक्त खर्च करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा दूरध्वनीद्वारे तसेच लेखी पत्रव्यवहार करून काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्याने अद्यापही काम पूर्ण केलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता संबंधित ठेकेदार हा बाहेरील जिल्ह्यातील असून, काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याला बहुतांश बिलाची रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उर्वरित काम पूर्ण करण्यास तो सातत्याने टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे कामाच्या मंजुरीपासून ते देयक अदा करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे. नागरिकांनी या प्रकरणात संबंधित ठेकेदाराविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याच्याकडून झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली करावी, तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सरकारने पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि वृक्षतोड कमी करण्याच्या उद्देशाने राज्यभर विद्युतदाहिनी प्रकल्पांना प्रोत्साहन दिले. मात्र माणगावातील हा प्रकल्प प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्प्रभ ठरला आहे. नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळाली नाहीच, उलट कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी वाया गेला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि विद्युतदाहिनी तातडीने सुरू करून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी माणगावकरांकडून होत आहे.
विद्युतदाहिनी सुरू होणार कधी?
पाच वर्षांहून अधिक काळ बंद पडलेल्या विद्युतदाहिनीमुळे नागरिकांना आजही पारंपरिक पद्धतीनेच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे हे अपयश ठरत असून, संबंधित यंत्रणा नेमकी कधी कार्यान्वित होणार आणि जबाबदारांवर कारवाई कधी होणार, याकडे संपूर्ण माणगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.






