| माणगांव | प्रतिनिधी |
उपजिल्हा रुग्णालय माणगांवमधील सफाई, धोबी विभागातील कर्मचार्यांनी कंत्राटदाराने वेतन न दिल्याने काम बंद आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन नगर पंचायत नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय माणगावमधील सफाई, धोबी विभागातील कर्मचार्यांनी माणगाव नगर पंचायत नगराध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक अलिबाग, वैद्यकीय अधीक्षक माणगाव, प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन कंत्राटदाराने पगार न दिल्याने काम बंद आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते.
त्याची दखल घेत नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, स्वच्छता सभापती अजित तार्लेकर, नगरसेवक दिनेश रातडवकर, पाणी पुरवठा सभापती राजेश मेहता यांनी उपजिल्हा रुग्णालायात डॉ. गोमसाळे व कर्मचारी यांची बैठक घेतली.यावेळी संबंधित ठेकेदारांना फोन करून लवकरात लवकर कर्मचार्यांचे पगार करा व कामावरून कमी केलेल्या कर्मचार्यांना परत कामावर घ्या असे सांगण्यात आले. तसेच यावेळी कर्मचार्यांनी आपल्या व्यथा बैठकीत मांडल्या. जिल्ह्याबाहेरील कंत्राटदार न देता स्थानिक कंत्राटदार देण्यात यावा अशी मागणी यावेळी कर्मचार्यांनी केली. व पुढील चर्चेसाठी 25 जानेवारी रोजी बैठक आयोजीत करण्यात आली असून दि. 19 जानेवारी रोजी स्वच्छता कंत्राटदाराने कर्मचार्यांचे एक महिन्याचे वेतन दिले असून कर्मचार्यांनी काम देखील सुरू केले आहे.