50 कोटींचा सुधारित नळ पाणीपुरवठा; या योजनेमुळे 25 वर्षांचे टेन्शन मिटले
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव शहरात सुमारे 50 कोटी खर्चाची सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू झाली आहेत. या योजनेमुळे मुबलक पाण्याच्या प्रतीक्षेत असणार्या माणगावकरांची पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे. जुन्या पाणीपुरवठा योजनेमुळे माणगावकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे विकासकांनी माणगावकडे पाठ फिरवली होती. या नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे माणगावकरांना पुढील 25 वर्ष शुद्धीकरण केलेले मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात माणगाव हे विकासाचे केंद्र बनणार असल्याचे बोलले जात आहे.
सुमारे 50 हजार नागरिकांना दर माणसी, दर दिवशी 135 लीटर पाणी देण्याची योजना माणगाव नगरपंचायतीने आखली आहे. 26 ऑगस्ट 2024 पासून या योजनेचे काम सुरू झाल्याची माहिती नगरपंचायतीचे पाणी पुरवठा अभियंता आकाश बुवा यांनी दिली आहे. सध्या रेल्वे पुलाकडच्या पूर्वेला असलेल्या भागात जुन्या नळ योजनेतून पाणी मिळणार आहे व पश्चिमेकडील गावातील भागासाठी खांदाड जवळ नदीच्या संगमाच्या अलीकडे नवीन जॅकवेल बांधून 7 लाख लीटरची पाणी साठवण्याची टाकी व स्वतंत्र फिल्ट्रेशन टाकी बांधण्यात येणार आहे. हे काम सध्या 30 टक्के झाले आहे. नागरिकांना पुरेसे शुद्ध पाणी मिळण्यासाठी ही पाणी पुरवठा योजना दोन विभागात करण्यात आली आहे. पूर्वीच्या टाकीची दुरुस्ती करण्यात आली असून, सुमारे 2 लाख 75 हजार लिटर, 2 लाख 25 हजार लिटर व 1 लाख लिटरच्या विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणार्या टाक्या बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुण्याच्या एस. के इंटर प्रायझेस मार्फत हे काम सुरू असून 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यात केंद्र सरकार 50%, राज्यसरकार 45% व माणगाव नगरपंचायत 5% असा खर्चाचा भार उचलणार आहे.
या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम गुणवत्तापूर्ण व पारदर्शक ठेकेदाराकडून नगरपंचायतीने करून घ्यावे, एवढीच लोकांच्या मापक अपेक्षा आहेत. त्यामुळे स्वच्छ व सुंदर, परिपूर्ण माणगाव हे स्वप्न माजी आमदार अशोक साबळे यांचे स्वप्न साकार होईल. तसेच, भविष्यात जिल्ह्याचे ठिकाण होण्यास एक पाऊल पुढे पडेल.
डॉ. मोहन दोशी,
सामाजिक कार्यकर्ते