माणगावची कोंडी सुटता सुटेना!

अपूर्ण बाह्यवळणाचा प्रवाशांना फटका

| माणगाव | सलीम शेख |

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण रस्त्याचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. त्यामुळे ऐन सुट्टीच्या आणि लग्न सराईच्या हंगामात कोकणात जाणारे आणि परत येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच शनिवारी (दि.16) पुन्हा एकदा हजारो प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यावेळी महामार्गावर तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

सध्या सुट्टीचा हंगाम असून, सगळीकडे लग्नसराईची देखील धावपळ सुरू आहे. त्यामुळे अनेकजण आपली खासगी वाहने घेऊन कोकणाच्या दिशेने निघाले. तर, काही जण कोकणातून परतीच्या मार्गाला लागले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुक कोंडीची समस्या उद्भवत आहे. त्यावर तोडगा म्हणून माणगाव-इंदापूर वाह्यवळण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, हा रस्ता वर्षानुवर्षे रखडला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव-इंदापूर दरम्यान प्रवासी वर्गाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शनिवारी कोकणाच्या दिशेने निघालेल्या तसेच कोकणातून परतणाऱ्या वाहनांनी अक्षरशः ठप्प करून टाकला होता. माणगावपासून दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहने तब्बल तीन ते चार तास जागच्या जागी खोळंबून राहिली होती. कडक उन्हात गाड्यांमधील प्रवाशांना पाणी, अन्न, इंधन आणि प्रसाधन गृहांचीही वानवा भासू लागली होती. ही वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी माणगाव पोलीस आणि वाहतूक शाखा आणि होमगार्ड यांनी प्रयत्न केले. परंतु, वाहनांचा इतका प्रचंड ओघ होता की त्यांच्या प्रयत्नांना मर्यादित यश मिळाले. त्यामुळे कोंडी पूर्णपणे सुटायला बराच वेळ लागला.

माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण मार्गाचे काम पूर्ण झाले असते, तर शहराच्या अंतर्गत बाजारपेठेतून जाणारी वाहतूक टळली असती आणि वाहतूक कोंडी निर्माणच झाली नसती. मात्र, गेल्या काही वर्षांत या बाह्यवळण रस्त्याचे अनेक ठेकेदार बदलले, लोकप्रतिनिधींकडून अनेक घोषणा झाल्या, परंतु, प्रत्यक्षात मात्र कामाची गती कायम संथच राहिली. परिणामी प्रत्येक सण, उत्सव आणि सुट्टीच्या काळात प्रवाशांना हीच यातना भोगावी लागत आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा मानला जातो. परंतु, त्याच महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे दरवेळी सामान्य प्रवाशांनाच मोठी किंमत मोजावी लागत आहे.

सरकार कधी जागे होणार?
इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळणाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत अशी वाहतूक कोंडी वारंवार उद्भवत राहील, हे स्थानिकांचे मत आता केवळ रोष नसून एक कटू वास्तव बनले आहे. सरकारने अनेकदा कामाच्या पूर्ततेच्या घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती “जैसे थे“च राहिली आहे. लाखो कोकणवासीय आणि पर्यटकांच्या सोयीसाठी या रखडलेल्या बाह्यवळण रस्त्याकडे सरकार नेमके कधी गांभीर्याने लक्ष देणार? हा प्रश्न आता एक ज्वलंत जनआक्रोश बनला आहे.
Exit mobile version