उरणमध्ये आंबा मोहोर समाधानकारक

| चिरनेर | प्रतिनिधी |

पोषक वातावरणामुळे उरण तालुक्यात आंब्याची झाडे बहरलेली आहेत. आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आला असून, काही ठिकाणी आंबे देखील आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उरण परिसरात भरघोस आंबा पिक येण्याचा अंदाज असल्याने, तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्राहकांना आंब्याची चव चाखता येणार आहे.

उरण तालुक्यात यावर्षी सुरुवातीला काही भागात ढगाळ वातावरण व नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुरळक अवेळी पाऊस झाल्यामुळे आंब्याच्या झाडांवर विपरीत परिणाम झाला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या थंडी आणि कोरड्या हवामानामुळे मोहर येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. कमी आद्रता व थंड वातावरण यामुळे मोहर धरायला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणच्या आंबाबागेत मोहर स्पष्टपणे दिसून येत आहे. तर, काही बागांमध्ये जानेवारीच्या सुरुवातीला बरसलेल्या पावसात मोहोर काळवंडून गेला. डिसेंबर अखेर व जानेवारीत थंडी वाढल्याने मोहर धरण्यास वातावरण अनुकूल झाल्याने, काही आंबा बागांमध्ये मोहर चांगलाच पकडला आहे.

उरण तालुक्यातील वाढते औद्योगीकरण पाहता आमराईंची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. परंतु, चिरनेर, कळंबुसरे, नागाव, केगाव, कोप्रोली, पाणदिवे, भोम, सारडे, वशेणी, पिरकोन, पाले, विंधणे, दिघोडे, कंठवली यांच्यासह तालुक्यातील अन्य गावांमध्ये समाधानकारक आंब्याचे पीक आल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर माळरानात हापूस, केशर, रत्ना, राजापुरी, पायरी, चोथापुरी, दशहरी अशा सुधारित जातींची झाडे लावली आहेत. त्यामुळे कमी वेळेत मोठ्या प्रमाणात फळे येतात. त्यामुळे नवीन आंब्याच्या कलमांमुळे कमी जागेत जास्त फळे येताना दिसत आहेत.

तुडतुड्यांनी सोडलेल्या चिकट पदार्थामुळे काही आंबा बागांमध्ये काळी बुरशी आंब्याच्या मोहराला पकडली आहे. त्यासाठी झाडावर साध्या पाण्याने जोरात कारंजे मारून झाडावरील आंबा मोहोरावरील चिकटा धुवून घ्यावा. त्यानंतर बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी. ही फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी.

-सुषमा गायकवाड,
कृषी सहाय्यक अधिकारी, उरण

ऊन, वारा अशा समतोल वातावरणामुळे उरण परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्यांना मोहोर आला आहे. काही ठिकाणी आंबे देखील आले आहेत. सध्याचे वातावरण आंबा शेवगा पिकाला अत्यंत उपयुक्त असल्यामुळे उरण परिसरात आंब्याचे चांगले पीक आले आहे. अजून मोहर बाहेर येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांनी कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे.

-अस्मित ठाकूर,
शेतकरी

Exit mobile version