अवकाळीमुळे आंबापीक धोक्यात; बागायतदार धास्तावले

फळांना मोठ्या प्रमाणात गळ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अवकाळी पडलेला पाऊस, त्यानंतर वाढलेले तापमान याचा विपरीत परिणाम आंब्यावर झाला आहे. अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात 250 हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. तापमान वाढल्यामुळे आंब्याची फळे मोठ्या प्रमाणात गळून पडण्यास सुरवात झाली आहे. आंब्यावरील संकटामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकुण 42 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 14 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास 21 हजार 424 मेट्रीक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदा मुबलक पाऊस आणि थंडी पडल्याने आंबा पीक चांगले येईल, अशी अपेक्षा बागायतदारांना होती. परंतु, अवकाळी पडलेला पाऊस, वाढलेले तापमान यामुळे फळगळती झाली. रोहा व कर्जत तालुक्यात जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे.

दरवर्षी आंब्याला ऑक्टोबर महिन्यात पालवी येण्यास सुरुवात होते. जानेवारी महिन्यात या पालवीला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरु होते. मात्र, यावर्षी ही प्रक्रिया उशिरा सुरु झाली. एकूण उत्पादनक्षम क्षेत्रापैकी 80 ते 85 टक्के क्षेत्रावर मोहोर आला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून कोकणातील आंबा बाजारात मुबलक प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आंबा तयार होण्याच्या स्थितीत असतानाच अवकाळी पाऊस पडला, त्यानंतर तपमानात वाढ झाली. वाढलेल्या उष्णतेचा फळांवर विपरीत परिणाम दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होईल की काय, अशी भीती बागायतदारांना वाटते आहे.

अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात 250 हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांनी तलाठी किंवा कृषी विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क साधावा. – डी.एस. काळभोर, कृषी उपसंचालक

Exit mobile version