नेवाळीत आंब्याची बाग उध्वस्त

शेकडो झाडे जमीनदोस्त, आंबा पिकाचे नुकसान

| नेरळ | प्रतिनिधी |

अवकाळी पाऊस आणि वादळी वारे याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यात नेरळ-कशेळे रस्त्यावर असलेल्या नेवाळी येथे असलेल्या आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या नेवाळी गावात शेतकर्‍यांनी आंब्याची बाग फुलविली आहे. त्या बागेत आंब्याची तसेच नारळ, चिकू यांची असंख्य झाडे आहेत. त्या बागेतील आंब्याला स्थानिक ग्राहकांकडून मोठी मागणी असते. केशर, हापूस या प्रकारचे आंब्याच्या झाडांचे वादळी वार्‍याने मोठे नुकसान केले आहे. येथील 300 आंब्याच्या झाडांवरील बहुसंख्य आंब्याची फळे जमिनीवर पडली आहेत. आंबे काढणीला आले असताना वादळी वार्‍याने होत्याचे नव्हते करून ठेवले आहे. शेतकर्‍याचे या बागेतील तर अनेक झाडे उन्मळून पडली आहे. वादळी वार्‍याने तेथील शेतकरी भोईटे यांच्या फळ पीक बागेचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी भोईटे हे आपल्या बागेतून 25 एप्रिलनंतर आंब्याची काढणी करीत असतात. त्यानंतर साधारण एक हजार डझन आंब्याची विक्री करीत असतात. मात्र, यावर्षी एकाही झाडावरून आंब्याचे फळ काढण्यात आले नव्हते. त्यामुळे वादळी वार्‍याने सर्व झाडांवरील आंब्याचे नुकसान झाले असल्याची माहिती तेथील स्थानिक शेतकरी पुंडलिक दुर्गे यांनी दिली आहे.

Exit mobile version