थंडीमुळे कलमांवर मोहोर बहरला; कीडनियंत्रणासाठी औषध फवारणी सुरू
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाल्याने हापूस आंबा कलमांवर मोहोर येण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सकाळ-संध्याकाळ जाणवणारी थंडी आणि कोरडे हवामान यामुळे बहुतांश भागात आंब्याच्या कलमांवर मोहोर बहरू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण असून यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.
यावर्षी सुरुवातीला काही भागांत ढगाळ हवामान आणि तुरळक अवकाळीमुळे आंबा कलमांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर आलेल्या थंड व कोरड्या हवामानामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. कमी आर्द्रता आणि थंड वारे यामुळे मोहोर धरायला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, कार्ले, नागलोली तसेच वडवली, वेळास आणि दिघी परिसरातील अनेक बागांमध्ये हापूस आंब्याच्या कलमांवर मोहोर स्पष्टपणे दिसू लागली आहे.
काही ठिकाणी मोहोर दाट असून उत्पादनाच्या दृष्टीने ही स्थिती उत्साहवर्धक मानली जात आहे. गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने आंबा उत्पादनात चढ-उतार पाहायला मिळत होते. मात्र, यंदा डिसेंबर अखेर व जानेवारीच्या सुरुवातीला थंडी वाढल्याने योग्य वेळी मोहोर येत असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. हवामान अनुकूल राहिल्यास येत्या काही आठवड्यांत श्रीवर्धन तालुक्यातून यंदा मुबलक हापूस आंबा बाजारात येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
औषध फवारणीला सुरुवात
मोहोर फुटल्यानंतर तुडतुडा, थ्रिप्स तसेच इतर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बागायतदारांनी प्रतिबंधात्मक औषध फवारणीला सुरुवात केली आहे. खर्चात वाढ होत असली तरी मोहोर सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक असल्याचे बागायतदार सांगत आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस थंडी कायम राहिली आणि अचानक पाऊस किंवा ढगाळ वातावरण झाले नाही, तर मोहोर टिकून राहून फलधारणेला मदत होईल. मात्र तापमानात अचानक वाढ किंवा अवकाळी पावसामुळे मोहोर गळण्याची शक्यता असल्याने बागायतदारांनी वेळेवर कीडनियंत्रण व बागेची योग्य निगा राखावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
