वाऱ्यामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेस विलंब; फळांवर किडी, रोगराई पसरण्याची शक्यता
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील भातपीक व नाचणी पीकाचे अतोनात नुकसान झाले असतानाच तालुक्यात आता आंबा पीक ही घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवकाळीने शेतकरी वर्गाच्या डोळ्यात अश्रू तराळत असतानाच आता आंबा बागायतदार ही धास्तावले आहेत.
श्रीवर्धन तालुक्यात नारळ व रोठा सुपारी या बागायती फळझाडे खालोखाल पीक घेतले जाते ते तृणधान्ये पिकातील भात, नाचणी आणि वर्षावलंबी फळझाडे वर्गात मोडणाऱ्या आंब्याचे. आंब्याच्या झाडाला साधारणपणे आक्टोबर अखेर ते नोव्हेंबर या महिन्यात मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते व ही मोहोर येण्याची प्रक्रिया जानेवारी महिना अखेर पर्यंत सुरू रहाते. परंतु, यावर्षी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण तसेच वादळी वाऱ्यामुळे अद्यापही मोहोर येण्यास सुरुवात झाली नाही. सध्याचे वातावरण बघता मोहोर प्रक्रियेस आणखी काही महिन्यांचा कालावधी जाणार आहे. फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात मोहोर येण्यास सुरुवात झाली तर फळधारणा साधारण तीन महिन्यांनी म्हणजेच जून महिना दरम्यान होईल व याच दिवसात ढगाळ वातावरण आणि पावसाचे दिवस सुरु होत असल्याने फळांवर किडी व रोगराई पसरण्याची शक्यता आहे. खराब आणि लहरी वातावरणामुळे या हंगामात आंबा उत्पादन घटण्याची भिती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
पेंढा मिळणे कठीण
परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचले, पीक कुजले त्यामुळे पेंढा नाही. अवकाळी पावसाने भातपीक संकटात आले आहे. भाताचा पेंढा हा आंबा फळ खोक्यात पॅकिंग करताना वापरला जातो. भाताचे अतोनात नुकसान झाल्याने पॅकिंग करीता पेंढा मिळणे कठीण झाले आहे.
पाऊस अद्यापही पडत असल्याने थंडी लांबणार आहे. त्यामुळे मोहोराची फुट उशिरा होणार. त्यामुळे येणारे फळधारणा लांबणीवर जाऊन पावसाळी दिवसात फळ येणार आहे. यामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे.
मंगेश कर्णेकर
आंबा बागायतदार
श्रीवर्धन





