शेतजमीनीत पाणी साठल्यामुळे लागवडीस उशिर
| पाली/ वाघोशी | प्रतिनिधी |
लांबलेल्या परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भात शेतीचे अतोनात नुकसान तर झालेच आहे. पण आता कडधान्य या नगदी पिकांवर देखील संकट ओढावले आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास साधारण बारा ते साडे पंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पीक घेतले जाते. भात शेतीची सर्व कामे आटोपल्यावर शेतकरी राजा आपल्या शेतात कडधान्य लावतो. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. मात्र, लांबलेल्या पावसामुळे सध्या कडधान्य पिकास पूरक हवामान देखील नाही. आणि शेतजमीनीत पाणी साठले आहे. भातपीक शेतात काढणी अभावी तसेच आहे. त्यामुळे आता कडधान्य लागवडीला मोठा उशीर होणार आहे. आणि त्याचे उत्पन्न देखील कमी असेल. ही सर्व कडधान्य पिके शेतकऱ्यांना रोख उत्पन्न देतात. परिणामी आता शेतकऱ्यांना नुकसानीला व अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
कडधान्य पिकाला फटका
जिल्ह्यात भातासह शेतीपुरक वाल, मूग, मटकी, तूर व चवळी आदी कडधान्यांची रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. कडधान्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास तिन ते चार हजार हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. त्यानंतर मुग, मटकी, चवळी, तूर आदीं कडधान्याची लागवड केली जाते. शेताच्या बांधावर तुरीची लागवड केली जाते तर बाकी कडधान्य शेतात लावले जाते. मात्र, परतीच्या पावसामुळे हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेल्यामुळे कडधान्य पिकांना देखील धोका आहे. भात शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साठले असल्यामुळे शेतकऱ्यांना कडधान्य पिकासाठी मशागत करणे आणि कडधान्याची लागवड करणे आता तरी शक्य नाही. त्यामुळे कडधान्य पिकांना फटका बसला आहे आणि यंदा कडधान्याची पिक कमी येण्याची शक्यता कृषी तज्ञांकडून वर्तवली जात आहे.
भात शेतीचे नुकसान तर झालेच मात्र आता कडधान्य पिकाला देखील फटका बसला आहे. शेतीचे शास्त्र असते त्यानुसार प्रत्येक हंगाम सांभाळावा लागतो. त्या-त्या हंगामात ते-ते पीक घेणं अपेक्षित असतं तरच हाती चांगले उत्पादन व उत्पन्न मिळते. मात्र, परतीच्या पावसामुळे आता कडधान्य पिकाचा हंगाम जवळपास गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. स्वतःच्या शेतात लावलेले चार किलोचे चवळीचे पीक परतीच्या पावसामुळे खराब झाले आहे.
शरद गोळे, अध्यक्ष,
कृषी मित्र संघटना, सुधागड-पाली






