| माणगाव | प्रतिनिधी |
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून, माणगाव तालुका शेतकरी संघटना 10 नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहे. याबाबतची माहिती आजपासून संघटना तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेऊन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तालुक्यातील शेतकऱ्यांना देणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सांगितले.
माणगाव तालुका शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व सदस्यांची बैठक मंगळवारी (दि.4) कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव याठिकाणी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आसमानी संकट कोसळले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला भात पीक शेतातच आडवा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी करून रचून ठेवलेल्या मळण्या भिजल्या आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांचे हे भात पूर्णतः नष्ट झाले असून, गरीब शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत. यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपली एकजूट व ताकद दाखवून येत्या 10 नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संघटनेचे अध्यक्ष पवार यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव-भगिनी यांना केले आहे. या बैठकीला संघटनेचे रामभाऊ टेंबे, सरपंच कदम, अशोक पाटील, सखाराम जाधव, वडेकर गुरुजी, नितीन वाघमारे, सुभाष गुगळे, विश्वंभर दांडेकर, काशीराम पोवार, बाबू पाखुर्डे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते.





