फळधारणा गळतीमुळे आंबा बागायतदार चिंतेत

वाढत्या उष्णतेमुळे मोहर करपला

| चिरनेर | प्रतिनिधी |

निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे रायगडसह उरण तालुक्यातील आंबा पीक धोक्यात आले असून, शेतकरी चिंतेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या कृषी विभागामार्फत रायगड जिल्ह्यात तांत्रिक मार्गदर्शन व उपाययोजना करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ विविध तालुक्यांतील आंबा बागांना भेटी देत आहेत.

याच अनुषंगाने सहयोगी प्राध्यापक डॉ. व्ही.पी. दामोदर, कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. व्ही.पी. सावंत, पीक संरक्षण विषयातील शास्त्रज्ञ डॉ. जीवन आरेकर, उरण तालुका कृषी अधिकारी ऋतुजा सुळ, कृषी पर्यवेक्षिका बरकूल, कृषी सहाय्यक अधिकारी सुषमा अंबुलगेकर, कृषी सहाय्यक अधिकारी सूरज घरत तसेच कृषी सहाय्यक अधिकारी भजनावळे यांनी येथील आंबा बागायतदारांच्या बागांना भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत परतीचा पाऊस लांबल्यामुळे आंबा पिकावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल होत असल्याने तालुक्यातील आंबा बागांवर विपरीत परिणाम झाला आहे. यंदा परतीचा पाऊस उशिरापर्यंत सुरू राहिल्याने आंबा झाडांना मोहर उशिरा आला. त्यातच पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित उष्णता न मिळाल्याने मोहर व्यवस्थित फुलला नाही. डिसेंबर महिन्यात योग्य प्रमाणात थंडी पडल्याने झाडांना चांगला मोहर आला होता आणि बागायतदारांनाही समाधानकारक उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, जानेवारी अखेरपासून हवामानात झालेल्या बदलामुळे परागीकरणावर परिणाम झाला. काही ठिकाणी पुन्हा मोहर दिसून आला; परंतु अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाडांवरील उरलेला मोहर करपून गेला. याआधी लागलेली फळधारणादेखील कमी झाली असून, लहान फळे गळू लागल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या दिवसा उन्हाचा कडाका वाढू लागल्याने वाढत्या उष्णतेचा परिणाम मोहरावर होत असून, तो काळवंडू लागला आहे. यासोबतच थ्रिप्स व तुडतुडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. महागडी औषधे फवारूनही आंबा पिकावरील किडी पूर्णपणे नियंत्रणात येत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार कृषी विभागाने तालुक्यातील आंबा बागायतदारांना नुकसानभरपाईच्या माध्यमातून योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषी विभागाने केवळ पाहणी करून थांबणे पुरेसे नाही. नुकसानग्रस्त आंबा बागांची तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा. तसेच आंबा बागायतदार शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत मिळवून द्यावी. तरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा मिळेल.

-प्रफुल्ल खारपाटील,
शेतकरी

Exit mobile version