कोकणचा राजा रुसला; आंबा बागायतदार चिंतेत

कृषी विद्यापीठाचे संशोधन कूर्म गतीने

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

हवामानबदलाचा फटका दरवर्षी पिकाला बसत असून, वर्षागणिक उत्पादनात घट होऊन त्याचा फटका आंबा बागायतदारांना बसत आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त असून, कोकणचा राजा कोकणातून कायमचाच नाहीसा होईल की काय, अशी भीती त्यांना सतावत आहे. रायगडसह कोकणात एक लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याच्या बागा आहेत. नैसर्गिक आपत्ती, हवामानबदल आणि सातत्याने आंबा बागांवर किडींचा होणारा प्रादुर्भाव यामुळे आंबा बागायतदार बेजार झाले आहेत. सततच्या संकटांमुळे आंबा उत्पादनात दरवर्षी मोठी घट होत आहे. मात्र, त्यातुलनेत उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे.

कोकणात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे. पण या विद्यापीठातून आंबा बागांच्या किड व्यवस्थापनावर होत असलेले संशोधन हे कासव गतीने होत असल्याचा आरोप आंबा बागायतदार शेतकरी करतआहेत. विद्यापीठातील संशोधन पूर्ण होईपर्यंत आंब्याला लागलेली कीड म्युटंट बदलून नव्याने आंब्याच्या बागा कुरतडत आहेत. शेतकरी विविध देशी जुगाड करून आपल्या बागा वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत.

गेल्या काही वर्षात कोकणात आलेले निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते वादळ यामुळे अनेक आंब्यांच्या बागांची पडझड झालेली आहे. कोरोनाचा आंब्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. सर्व संकटातून आंबा बागायतदार शेतकरी पोटच्या मुलाप्रमाणे आंब्याच्या बागांची काळजी घेत आहे. मात्र, आधुनिक संशोधनातून या शेतकर्‍यांना ज्यांनी तातडीने दिलासा द्यायला हवा, त्या कृषी विद्यापीठाला मात्र आंबा पिकांच्या रोगराईवर उपायच सापडत नाही. कोकणातल्या आंबा पिकांवर आलेले हे संकट दूर करण्यासाठी कृषी विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा कोकणचा राजा कोकणातून कायमचा हद्दपार होईल, अशी चिंता व भीती येथील आंबा व्यावसायिकांना सतावत आहे.

आंबा बागायतदार संदेश पाटील म्हणाले की, गेली चार-पाच वर्षे लांबलेला पाऊस ही समस्या मोठी आहे, यामुळे बागायतीचे गणित बिघडलेले आहे. याचा परिणाम म्हणजे, आंब्यावरील रोग वाढत आहेत. झाडांवर येणार्‍या सूक्ष्म कीड, फुलकिडे नियंत्रणात आणणारी औषधे प्रचंड आहेत. आंबा पीक संवर्धन व संरक्षण करण्यासाठी येणारा खर्च 40 टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे, कामगारांची मजुरी वाढलेली आहे, स्थानिक कामगार उपलब्ध होत नसल्याने बाहेरून मजूर आणावे लागतात, यामध्ये अधिक खर्च वाढतो, त्यातुलनेत आंबा उत्पादन व उत्पन्न कमी आहे. शेतकर्‍यांचे उत्पादन वाढत नाही, मात्र उत्पादन खर्च वाढला आहे. सुफला खताची गोण 350 रुपयाला मिळायची, तिची किंमत आता 1500 रुपये झाली आहे. शेणखताचे व सेंद्रिय खताचे भाव वाढले आहेत. कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांनी संयुक्त मोहीम राबवून यामध्ये शेतकर्‍यांना या मोहिमेत सामावून घेतले पाहिजे, असे संदेश पाटील म्हणाले.

सरकारने कीटकनाशके व खते यांच्या किमती नियंत्रणात ठेवाव्यात. जेणेकरून शेतकर्‍यांना ते सोयीचे ठरेल. कृषी विद्यापीठे व कृषी विभाग यांनी या कीड रोगांवर संशोधन करणे गरजेचे आहे. हे संशोधन लोकाभिमुख असायला पाहिजे. कीटकनाशके औषधे प्रचंड महागली आहेत, ती स्वस्त झाली पाहिजे.

संदेश पाटील, आंबा बागायतदार

आंबा बागायतीमध्ये तुटतुडे, थिप्स, बुरशीजन्य आजार आहेत. बुरशीजन्य आजारात डायबॅक हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये व लहान झाडांच्या फांद्या सुकतात, अशा अनेक आजारांवर संशोधन होत नाहीत. संशोधनाला उशीर झाल्याने हे आजार निघून जातात. त्यामुळे आंबा बागायतीचे खूप मोठे नुकसान होते, हे नुकसान कधीही भरून निघणारे नाही.

वरुण पाटील, आंबा बागायतदार
Exit mobile version