हवामानातील बदलामुळे यंदा आंबा अधिकच आंबट

। कोर्लई । राजीव नेवासेकर ।
मागील दोन वर्षांपासून हवामानात सातत्याने होणार्‍या बदलामुळे आंबा मोहोर गळून बागायतदारांचे नुकसान झाले असून यंदा आंबा अधिकच आंबट झाला असल्याची प्रतिक्रिया मुरुड तालुक्यातील मजगांव ग्रामपंचायत हद्दीतील खारमजगांव येथील बागायतदार शेतकरी कृषिमित्र अनंता कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

वेळोवेळी हवामानात होणारे बदल ढगाळ पावसाळी वातावरण यातून आंबा मिळेल या अपेक्षेने चार वेळा विविध औषध फवारणी केली. मात्र, याचा परिणाम दिसून आला नाही. उलट आंबा मोहोर अति उष्ण तर काही वेळा हवामानात चढ उतार यामुळे जळून नष्ट झाला आहे. आमच्या बागायतीत 150 बाजती कलमी आंब्याची झाडे आहेत. काही झाडांना आताशी मोहर दिसत असून छोट्या छोट्या कैर्‍या यायला सुरुवात झाली असताना फळ गळून पडत आहे. त्यामुळे यावर्षी 10 ते 15 टक्के आंबा पिक हाती येईल यासाठी अजून दिड महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार असे वाटते आहे.

शासनाच्या कृषी विभागाने तालुक्यातील आंबा पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.

अनंता कांबळे, कृषिमित्र
Exit mobile version