हवामान बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी

सरकारने अनुदान देण्याची व्यवस्था करावी
| पाली/बेणसे । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यातील उसरोली येथे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने शेतकरी बांधवाना कृषी फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया क्षेत्रासाठी मार्गदर्शनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील चार पाच वर्षापासून जागतिक हवामान बदलाचा फटका हा कोकण पट्ट्यातील विभागातील आंबा, भाजीपाला, फळे, कडधान्य व सर्व प्रकारच्या फलोत्पादनावर होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील सुमारे 20 % आंब्याचे उत्पादन आले होते.

हवामान बदल परिणामामुळे आंब्याचे उत्पादन कमी झाले असून त्यांना बाजार भाव देखील खूपच कमी मिळाल्यामुळे सरकारने दखल घेत अनुदान देण्याची व्यवस्था करावी असे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले आहे. कित्येक शेतकर्‍यांना पूर्वी आपल्या आंबा झाडावर आठ वेळा कीटकनाशकांची फवारणी करावी लागत होती ती आता 12 वेळा फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन करताना तारांबळ होत आहे. आंबा पीक विम्याचा पहिला हप्ता ही वाढविल्यामुळे आज 56000 असलेल्या आंबा बागायतदारांना आंबा पीक विम्याचा फायदा घेता येत नाही.

तसेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुबलक प्रमाणात होणारा भाजीपाला हा आजच्या घडीला खूपच कमी प्रमाणात होत असून त्यामुळे देखील शेतकरी वर्गाचे आर्थिक उत्पादन घटले आहे.परिणामी कृषी फलोत्पादनातील शेतकर्‍यांचे उत्पादन घटून से 50 टक्यावर आले आहे. शेतीचे उत्पन्न घटल्यामुळे ते अडचणीत आले आहेत असे मोकल यांनी सांगितले. यावेळी मान्यवर मंडळींनी आंबा फळ पिक विमा आदि जिव्हाळ्याच्या समस्यांवर विचारविनिमय करून त्यांच्या सोडवणूकीसाठी प्रयत्न केला,निर्यातक्षम व सेंद्रीय उत्पादनांवर भर देण्यासाठी मार्गदर्शन केले. शासनाने नवनवीन बाजारपेठ शोधून कृषीमाल निर्यात वाढविणे साठी शेतकर्‍यांना मदत करणे, विकेल ते पिकेल यावृष्टीने शेतकर्‍यांसाठी प्रभावी योजना आखल्या आहेत याची माहिती मुरुड येथील शेतकरी वर्गाला देण्यात यावेळी देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल, डॉ. नामदेव म्हसकर कनिष्ठ कृषीविद्यावेत्ता,प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, मनिषा भुजबळ, गोदरेज युवराज सिसोदिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version