कर्नाटकी आंब्याचे हापूसवर अतिक्रमण

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची तक्रार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

कोकणचा हापूस आंबा आपल्या खास चव, सुगंध आणि दर्जामुळे देश-विदेशात लोकप्रिय आहे. मात्र, हापूससारखा दिसणारा कर्नाटक तसेच दक्षिणेकडील आंबा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने हापूसवर अक्षरशः अतिक्रमण होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने केला आहे. ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी प्रत्येक राज्यातील आंब्याला स्वतंत्र लेबल लावण्याची मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रायगडसह संपूर्ण कोकण पट्ट्यात हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कोकणातील हापूस चवीला गोड, रसाळ आणि दर्जेदार असल्याने स्थानिकांसह राज्य, देश आणि परदेशातील ग्राहकांकडून त्याला मोठी मागणी असते. कोकणात हजारो एकरांवर आंब्याची लागवड असून, सुमारे 65 हजारांहून अधिक शेतकरी या व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र, यंदा बदलत्या हवामानाचा फटका आंबा उत्पादनाला बसला असून, अवघे 10 टक्के उत्पादन अपेक्षित असल्याचे चित्र आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय परिस्थितीचाही परिणाम जाणवत आहे. अमेरिका-इस्त्राईल-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील संयुक्त अरब अमिरातीसह इतर देशांमध्ये आंब्याची निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी, स्थानिक बाजारावर दबाव वाढला आहे.

मागील आठवड्यापासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हापूसचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. याच काळात कर्नाटक आणि दक्षिणेकडील आंब्याची आवक वाढल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. विशेष म्हणजे, हापूससारखा दिसणारा हा आंबा किलोने विकला जात असताना कोकणी हापूस नगाने विकला जातो. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असून खऱ्या हापूसच्या विक्रीवर त्याचा थेट परिणाम होत आहे. या परिस्थितीत हापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत असून, त्यांच्या उत्पन्नावर गदा येत आहे. हापूसची ओळख आणि विश्वास टिकवण्यासाठी प्रत्येक राज्यातील आंब्याला वेगवेगळे लेबल लावणे अत्यावश्यक असल्याची ठाम भूमिका आंबा उत्पादक संघाने मांडली आहे.

ग्राहकांची फसवणूक थांबवावी
हापूससारखा दिसणारा इतर राज्यांतील आंबा बाजारात येत असल्याने ग्राहकांना खरा-खोटा आंबा ओळखणे कठीण जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक तर होतच आहे, पण कोकणातील हापूस उत्पादकांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासन आणि बाजार समित्यांनी तातडीने हस्तक्षेप करून लेबलिंग सक्तीचे करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

कोकणचा हापूस हा केवळ फळ नाही, तर तो येथील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा आहे. हापूससारखा दिसणारा इतर आंबा बाजारात येऊन त्याची प्रतिमा मलिन होत असेल, तर ते थांबवणे गरजेचे आहे. प्रत्येक आंब्याला स्पष्ट लेबल लावल्यास ग्राहकांचा विश्वास टिकेल आणि शेतकऱ्यांचे नुकसानही टळेल.

– चंद्रकांत मोकल

Exit mobile version