घरकुल योजनेत हेराफेरी

निगडे ग्रामपंचायतीमधील प्रकार उघड

| पेण | प्रतिनिधी |

मोदी आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात देशपातळीवर घरकुल योजना राबविण्यात आली आहे. मात्र, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे उघड होत आहे. पेण तालुक्यातील निगडे ग्रामपंचायतीमध्ये 35 लाभार्थ्यांची यादी मंजूर झाली असून, त्यांच्या खात्यावर 15 हजारांप्रमाणे पहिला हप्ताही जमा झाला आहे. मात्र, 35 लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी असल्याचे समोर आले आहे.

याबाबत पेण पंचायत समिती येथून घेतलेल्या माहितीनुसार निगडे ग्रामपंचायतीमध्ये 25 जुलै 2023 रोजी सर्वेक्षण करून ग्रामसभेच्या ठरावाने 46 जणांच्या नावांची यादी पंचायत समितीला देण्यात आली होती. त्यातील 35 जणांच्या नावाची यादी मंजूर करण्यात आली. ही यादी 18 सप्टेंबर 2023 रोजी ग्रामसेवक व सरपंचाच्या सहीने गटविकास अधिकार्‍यांना दिली. या यादीमधील लाभार्थ्यांमध्ये सरकारी कर्मचारी, मयत व्यक्ती, पक्की घर असणार्‍या व्यक्तींचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. ही सर्व बाब ग्रामसेविका विशाखा पेडवी यांना माहिती असूनदेखील त्यांनी सदरील यादी पंचायत समिती पेण येथे दिली. घरकुलांची अंतिम यादी झाल्यानंतर या यादीची पडताळणी न करता 35 लाभार्थ्यांच्या खात्यावर 15 हजारांप्रमाणे 28 फेब्रुवारी 2024 रोजी योजनेचा पहिला हप्ता जमा झाला. मात्र, निगडे गावातील जागरुक नागरिकांना हे लक्षात आले की, ज्यांना खरंच लाभ द्यायचे होते, ते लाभार्थी वंचित राहिले असून, ज्यांची घरं पक्की आहेत, त्यांना मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळाला आणि तशा प्रकारची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली. गटविकास अधिकारी यांना ग्रामसेविकेने केलेली चूक लक्षात आणून देताच त्यांनी तातडीने सर्वच्या सर्व म्हणजेच 35 खाती तात्पुरती बंद केली.

या प्रकाराबाबत आमच्या प्रतिनिधींनी गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोल यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, निगडे येथील 35 लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याचे आदेश 23 मार्च रोजी बांधकाम अभियंता सूर्यकांत परब यांना दिले आहेत. त्यांनी त्यांचे अर्धे काम उरकलेले आहे. येत्या सोमवारपर्यंत ते पूर्ण अहवाल देतील. जोपर्यंत योग्य लाभार्थी असल्याची खात्री होत नाही, तोपर्यंत आम्ही लाभार्थ्यांचे बंद केलेले खाते पुन्हा चालू करणार नाही. येत्या सोमवारपर्यंत पूर्ण अहवाल आमच्या हातात येईल. याच्यात दोषी असणार्‍यांवर आम्ही रितसर कारवाई करू.

ग्रामसेविकेचा बोलण्यास नकार दिला
निगडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका विशाखा पेडवी यांना आमच्या प्रतिनिधींनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना संपर्क होत नव्हता. अखेर पेण पंचायत समितीचे वरिष्ठ लिपिक संजय कांबळे यांनी त्यांना संपर्क करून आपण कुठे आहात अशी विचारणा केली तेव्हा मी ग्रामपंचायतमध्ये पोहोचत आहे असे उत्तर दिले. परंतु 11ः30 वाजले तरी त्या ग्रामपंचायतीमध्ये पोहोचल्या नाही. अखेर पुन्हा संपर्क करून विचारणा केली की, मोदी आवास घरकुल लाभार्थ्यांच्या योजनेची यादी तयार करत असताना आपण योग्य लाभार्थी आणि अयोग्य लाभार्थी याविषयी ग्रामसभेशी बोलणे केलेत का? तेव्हा त्यांनी उत्तर देण्यास टाळले. तसेच सचिव म्हणून आपली जबाबदारी काय हेसुध्दा सांगण्यास त्यांनी टाळले. फक्त एकच उत्तर त्या देत होत्या, ग्रामसभेने सांगितले म्हणून मी यादी केली. महत्त्वाची बाब म्हणजे, ग्रामस्थांकडून व सरपंचांकडून चुकीच्या बाबी होऊ नये म्हणून सरकारने ग्रामसेवक म्हणून सचिव नेमला आहे, याचा विसर पडतो. या घरकुल योजनेत हेराफेरी झाली असून, ग्रामसेविका विशाखा पेडवी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आपल्या कर्तव्यात कुचराई केल्याचे समोर येत आहे.
Exit mobile version