। नाशिक । प्रतिनिधी ।
ओझर येथील मुंबई-आग्रा महामार्गावर गडाख कार्नर समोरील उड्डाणपुलावर एक दुर्दैवी घटना घडली. एका दुचाकीस्वाराच्या गळ्याला पतंगाचा मांजा लागून त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना ओझर येथील मुंबई-आग्रा महामार्गावर रविवारी (दि.10) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. नीलेश दत्तू वाघ (28) हे आपल्या दुचाकीवरून नाशिककडे जात होते. दरम्यान, गडाख कॉर्नरसमोरील उड्डाणपुलावर आले असता पतंगाचा मांजा त्याच्या गळ्याला लागला. यात त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ओझर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान एक महिन्यापूर्वीही ओझरच्या नवीन इंग्रजी शाळेसमोर सर्व्हिस रोडवर दुचाकीस्वाराच्या गळ्याला मांजा लागून तो गंभीर जखमी झाला होता.