गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; सरकारमधील तणाव वाढल्याची चर्चा
। जालना । वृत्तसंस्था ।
मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता मुंबईकडे कूच केली. आंतरवाली सराटीमधून निघालेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत लाखोंचा जनसमुदाय देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई आंदोलनावर जरांगे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मनोज जरांगे भावूक यावेळी अंतरावाली सराटी येथून मराठा समाज त्यांच्यासोबत निघाला आहे. मनोज जरांगे अंतरावाली सराटीतून निघाल्यावर पुन्हा भावूक झाले. शनिवारी सकाळापासून दुसऱ्यांदा त्यांच्या डोळ्यात आश्रू आले. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. 26 जानेवारीला मुंबईतील गल्ली गल्लीत मराठा दिसणार आहे. आता मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही. मी मरण्यास भीत नाही. समाजासाठी मी लढत राहणार आहे. मराठ्यांनी आरक्षण घेण्यासाठी माझ्यामागे पुन्हा एकदा ताकदीने उभे राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील केले.
एक-एक करून जरांगे पाटलांच्या मागण्या या वाढतचं आहेत. जरांगे पाटील सरकारला वारंवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जरांगे आणि सरकारमधील तणाव वाढला असून यापुढे जरांगेंशी सरकार चर्चा करणार नाही, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली आहे. यासोबतच यापुढे जरांगेंशी चर्चा न करण्यावर एकमत झाल्याचे देखील सांगितले जात आहे. यादरम्यान सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
शंभूराजे देसाई म्हणाले की, तणाव वाढण्याची परिस्थिती असती तर आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे चर्चेसाठी गेलो नसतो. त्यांची भूमिका समजून घेऊन सकारात्मक निर्णय घेतले नसते. जरांगे यांच्या आंदोलनाला सुरूवात झाली ती मराठवाड्यातील नऊ जिल्ह्यात कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देणे इथंपासून झाली. जिल्ह्यात पुरावे शोधणं इथून जरांगे यांच्या आंदोलनाला सुरूवात झाली. आता त्यांची मागणी राज्यासाठी आहे. तरी सुद्धा सरकार सकारात्मक आहे, असेही देसाई म्हणाले.